गिरीश महाजन यांचे अभिनंदनीय पाऊल!

0

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने 2017 साली मान्यता दिली. त्यानंतर 2018 मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश देण्यात आला. काल वैद्यकीय महाविद्यालयाच्या  इमारत बांधकामाचा इ-भूमिपूजन सोहळा पुणे येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला. जळगावच्या वैद्यकीय  महाविद्यालयाचे  वैशिष्ट्य असे की,  एकाच छाताखाली विविध प्रकारची चिकित्सा पद्धतीचा  लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे शासनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. एकाच छताखाली  सर्व चिकित्सा पद्धतीच्या अभ्यासामुळे  आधुनिक तसेच प्राचीन  वैद्यकीय पद्धतीच्या संशोधनास चालना मिळणार आहे.

या वैद्यकीय संकुलात वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमियोपॅथी, भौतिकोपचार महाविद्यालयाची निर्मिती होणार असल्याने सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. जलसंपदा व वैद्यकीय  शिक्षण मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावला मिळाले. जळगाव लगत असलेल्या चिंचोली गावाच्या शिवारात 136 एकर जागेत हे वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्यात 500 खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 19190.24 लाख रुपये निवासस्थाने वस्तीगृहाच्या बांधकामासाठी 26695.65 लाख एवढ्या  रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी क्षमता 100 वरुन 150 करण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात सीपीएस, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली आहे. याशिवाय शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगावकरिता 100 विद्यार्थी प्रवेशास मान्यता मिळाली आहे. जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  सुरु होणार असल्याने उत्तर महाराष्ट्र परिसरातील रुग्णांसाठी उपचारासाठी अद्ययावत दालन सुरु होणार आहे.

जळगाव शहर खाजगी वैद्यकीय सेवेतही अग्रेसर आहे. दूरदूरचे  जळगावात उपचारासाठी येतात आता अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार असल्याने वैद्यकीय सेवेत जळगाव अग्रेसर बनणार आहे. परिसरातील रुग्णांना मुंबर्इ पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याची आता आवश्यकता भासणार नाही.जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचे खरे श्रेय पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच जाते. गिरीश महाजन आमदार झाल्यापासून किंबहुना आमदार होण्यापुर्वीपासून जामनेर शहर तसेच तालुक्यातील गोर-गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी अग्रेसर असायचे. कालांतराने  त्यांच्याकडे जामनेर तालुक्याऐवजी जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांचा संपर्क वाढला. या रुग्णांच्या  सेवेसाठी गिरीश महाजन यांनी स्वतंत्र व्यवस्थाही केली. आताचे गिरीश महाजनांचे  स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख हे मोठ्या आत्मियतेने या सेवेत  सहभागी होते. गिरीश महाजन आमदार म्हणून निवडून येण्यात त्यांच्या रुग्णसेवेचा मोठा वाटा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आमदार गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे आरोग्यदूत म्हणून ओळख बनली. जळगाव जिल्ह्यातून मुंबर्इला गेलेल्या रुग्णांनी मुंबर्इमध्ये राहण्याची तसेच त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करायचे याची व्यवस्था अरविंद देशमुख हे करायचे म्हणून अरविंद देशमुख यांनासुद्धा आरोग्यदूत संबोधले जाऊ लागले.  सांगायचे तात्पर्य एवढेच की, पालकमंत्री  गिरीश महाजन यांना गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची  मुळापासून आवड होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावला सुरु झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परिसरातील गोर-गरीब रुग्णांना आता जळगावलाच वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार मिळणार आहेत. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या चिकित्सा पद्धतीची सेवा मिळणार आहे. ज्याला ॲलोपॅथी हवी असेल, आयुर्वेद चिकित्सापद्धती अथवा होमियोपॅथी चिकित्सा पद्धती हवी असेल त्या सर्व उपचार पद्धती उपलब्ध राहणार आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयामुळे रुग्णांच्या सेवेसाठी एक अद्यावत दालन ग्रामीण परिसरात निर्माण झाले आहे.  गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत हे महाविद्यालय सुरु झाले. हे मात्र या परिसरातील जनता विसरणार नाही. ग्रामीण भागातील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  शिक्षण हे दर्जेदार राहण्यासाठी तसेच रुग्णांच्या सेवेत अग्रेसर  राहील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दुर्धर अशा रोगावर उपचार घेण्यासाठी पुणे- मुंबर्इला रुग्ण जातात अशा रुग्णांसाठी सेवा देण्यात जळगावचे वैद्यकीय महाविद्यालय अग्रेसर बनावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आतापासून तशा प्रकारची शिस्त जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात लावली जावी हीच अपेक्षा. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी  विद्यार्थ्यांचा ओढा जळगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे असला पाहिजे तसे दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था या महाविद्यालयात व्हावी म्हणजे जळगावच्या  वैद्यकीय महाविद्यालयाचा नावलौकिक निर्माण व्हावा, तशी जळगावची ओळख निर्माण व्हावी.

Leave A Reply

Your email address will not be published.