आ. भोळे यांच्या अपघात अन्‌ महापालिकेची सारवासारव

0

जळगाव शहरातील खराब रस्ते आणि त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गेल्या दोन वर्षापासून जळगावकर त्रस्त झाले आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम चालू असल्यामुळे रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे कारण दिले जात असले तरी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यास अथवा रस्त्यांची डागडुजी करण्यास महापालिकेला  कसली अडचण हे मात्र कळत नाही. कोणत्याही नागरी समस्यांचे निराकरण महापालिकेकडून तातडीने केले जात नाही, हे मात्र खरे आहे.कारण रिंगरोडवरील बहिणाबाई उद्यानाजवळ गटारीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून रेंगाळत पडले आहे. त्याचा परिणाम रस्त्यांच्या एका बाजूने वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेय. त्याच रस्त्यावर जळगाव शहराचे भाजपचे आ. सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात ते जखमी झाले. सध्या त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे छातीला जबर मुकामार बसलाय. डोळ्याजवळ जखम झाली असून चार टाके पडले आहेत.

आ. राजुमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात झाला तेव्हा मागून एखादे मोठे वाहन आले असते तर….! कल्पनाच करवत नाही आ. भोळे यांच्या दुचाकीला अपघात झाल्यानंतर मात्र रिंगरोडवरील त्या गटारीचे काम महानगरपालिकेमार्फत  वेगाने सुरु करण्यात आले आहे. त्याआधीच ते काम पूर्ण झाले असते तर हा अपघातच  झाला नसता परंतु महानगरपालिका प्रशासनाला सांगणार कोण? ज्या प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक पाहिजे तो वचक राहिलेला नाही. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता येऊन एक वर्ष पुर्ण झाले. त्या आधीच्या सत्ताधाऱ्यांवर ओरडणारे भाजपचे कार्यकर्ते आता मात्र गप्प आहेत. आ. राजूमामा भोळे यांच्या अपघातानंतर महापालिका आयुक्त डॉ. टेकाळे तसेच उपमहापौर अश्विन सोनवणे  यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या प्रतिक्रिया हास्यास्पद अशा आहेत. उपमहापौर म्हणतात आ. भोळे यांचा अपघात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेला नाही असे समर्थन केले आहे. अहो रिंगरोडवरील दुभाजकाच्या एका बाजूचा रस्ता खोदल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एका रस्त्यावरून  होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही का? दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असती तर आ. भोळेंच्या दुचाकीसमोर शाळकरी मुलांच्या सायकली आल्याच नसत्या तसेच अपघात  झाल्यानंतर आता तातडीने काम करण्याचे आदेश दिले असे उपमहापौर म्हणतात. यापुर्वीच हे काम पुर्ण व्हायला हवे होते त्याचे काय? बांधकाम अभियंता सुनिल भोळे म्हणतात. तांत्रिक अडचणी आणि सततच्या पावसामुळे ते काम रेंगाळले होते. आता ते काम सुरु करण्यात येत आहे. याचा अर्थ  अपघात झाल्यापासून दररोज पाऊस येतोय आता पावसाचा व्यत्यय होत नाही का? आयुक्त डॉ. टेकाळे यांना तर रिंगरोडवर सुरु असलेल्या कामाची माहितीच नव्हती. याचे आश्चर्य वाटते.

जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेला सावळागोंधळ संपला पाहिजे. कारण कोणत्याही घटनेसंदर्भात स्वत:वरील जबाबदारी प्रशासनापासून ते लोकप्रतिनिधींकडून झटकली जाते. तसेच झालेल्या घटनेचे समर्थन करण्यात येते ही बाब वाईट होय. भाजपची सत्ता येऊन एक वर्ष पुर्ण झाले. एक वर्षाचा कालावधी विकासाच्या मोजमापासाठी अगदी अल्प असला तरी एक वर्षातील कामाचा लेखाजोखा करायचा म्हटले तर लोक प्रतिनिधीचे काम समाधानकारक नाही एवढे मात्र निश्चित. दोन महिन्यांपुर्वी शहरातील एक तरुण उद्योजक बोरोले यांचा रस्त्यावरील खड्ड्याने  बळी घेतला. भरचौकात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून दुचाकी चालवताना ते खड्ड्यात पडले आणि त्यांच्या अंगावरुन ट्रकसारखे अवजड वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या प्रति आपला निषेध नोंदवला. त्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली. मुरुम टाकून खड्डे बुजविण्यात आले. परंतु पावसामुळे ते खड्डे जैसेथे झालेले आहेत. परत येरे माझ्या मागल्या सुरु आहे. महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. त्याचे मूळ कारण शोधले पाहिजे ते होत नाही. आज संततधार पावसामुळे कॉलन्यांमधील रस्ते चिखलमय झालेले आहेत. रस्त्यावरुन चिखलात चालणे मुश्किल झाले आहे. दुचाकी वाहन चालवायला तर कसरतच करावी लागते. पण एकही लोकनियुक्त नगरसेवक त्या भागात फिरकत नाही आपण ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतोय, ज्या प्रभागातील जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना उसंतच  मिळत नाही काय? साफसफाईच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात ओरड झाली म्हणून आता थोडे काम ठिक चालले आहे काही दिवसानंतर पुन्हा जैसे  थे होऊ  नये हीच अपेक्षा. अन्यथा जिकडे- तिकडे घाणीचे साम्राज्य होईल आणि पुन्हा नागरिकांची ओरड सुरु होईल. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. अनेक निष्पाप जणांचा अपघाताने  बळी घेतला. परंतु ज्या दिरंगाईने महामार्गाच्या  चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्याला जबाबदार कोण? महापालिकेच्या अखत्यारीतील जी कामे त्या कामांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का? अमृत योजनेच्या ठेकेदाराला  दोष देऊन महापालिकेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु ठेकेदारास ज्या अंतर्गत परवानग्या मिळवून द्यायच्या आहेत. ते महापालिकेने मिळवून दिल्याशिवाय ठेकेदार काम कसे करणार? एकंदरीत  जळगाव महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी आणि गतीमान होण्याची गरज आहे. आ. भोळे यांच्या अपघातानंतर जी तप्तरता प्रशासनाने दाखविली तशी तत्परता नेहमीच  असणे आवश्यक आहे. या निमित्ताने महापालिकेचा कारभार गतिमान व्हावा, हीच अपेक्षा!

Leave A Reply

Your email address will not be published.