कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य: प्रा.डॉ.आर.पी.सिंह

0

भुसावळ (प्रतिनिधी )- ‘विद्यार्थी दशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी मांडले.

‘आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिस्त, मेहनत व उत्तम दर्जा या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकून घेतली, तर या संधींचा फायदा घेणाऱ्या अभियंत्यांना उज्ज्वल भविष्य आहे. नोकरीबरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.’ असेही डॉ.सिंह यांनी सांगितले.

चांद्रयान मोहिमेतून भरपूर शिकायला मिळेल:
भारताची महत्वकांक्षी चांद्रयान मोहीम ही अयशस्वी ठरलेली नसून त्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण ९५% पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो तसेच यात वापरले गेलेल्या सर्व तांत्रिक वस्तू भारतातच निर्माण केल्या होत्या म्हणून आपण सर्वांना भारतीय सॅटेलाईट व टेलिकॉम क्षेत्राचा अभिमान वाटायला हवा असे प्राचार्य म्हणाले.

युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा:

‘ध्येय साध्य करण्यासाठी आपली आवड आणि मर्यादा समजून घेऊन परंपरागत शिक्षण घेण्यापेक्षा जरा वेगळा मार्ग स्वीकारून त्यास दृष्टिकोन, कौशल्य आणि मेहनतीची भक्कम जोड देण्याची गरज असते,’ असा कानमंत्र प्रा.सुधीर ओझा यांनी दिला.

भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली. अभियंत्यांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे प्रा.सुधीर ओझा म्हणाले. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना समाज व राष्ट्राचे आपण काही देणे लागतो, ही भावना प्रत्येक अभियंत्याने जोपासावी व राष्ट्रहितासाठी तत्पर व सक्षम असायला हवे अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली.

डॉ.आर.पी.सिंह, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.