बुरशीयुक्त शेवयांचे पोषण कुणाच्या आशिर्वादाने! भाग -4

0

जिल्हा परिषद प्रशासनाचे तोंडावर बोट : वरिष्ठ अधिकार्‍यांचे हात पिवळे

जळगाव, दि. 11 –
जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या घरपोहच पोषण आहारात होत असलेला काळाबाजार अधिकार्‍यांच्या अंगाशी येत असल्याने अधिकार्‍यांनी हे प्रकरण झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे. बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षानेच झाल्याचे सिद्ध होत असताना ते मात्र नामनिराळे होण्याच्या तयारीत आहेत.

शड्डू ठोकणारे तोंडावर बोट ठेवून
जिल्हा परिषदेच्या विविध सभांच्या माध्यमातून प्रशासनाच्या
विरोधात शड्डू ठोकणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांनी मात्र या प्रकरणी मूग गिळून बसण्याची भूमिका घेतल्याने संशयाची सुई त्यांच्याकडेही जाते. धुळे येथील पुरवठादार संस्था भाजपा पदाधिकार्‍याची असल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांनी तोंडावर बोट ठेवून गंमत पाहण्याचा विडा उचलला आहे.

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील बुरशीयुक्त शेवयांनी प्रशासनाची झोप उडविली असली तरी प्रशासकीय अधिकारी मात्र तोंडावर बोट ठेवून दुसरीकडेच बोट दाखविण्यात धन्यता मानत आहेत. या प्रकरणाचे पोषण देण्याचे काम अधिकार्‍यांच्या कंपूनेच केले असून त्यांच्या बचावासाठी मात्र लोकप्रतिनिधींनी पदर खोचला आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी या प्रकरणाची सबळ पुराव्यानिशी तक्रार देवूनही प्रशासन गुन्हा दाखल करण्यात देखील धजावत नसल्याने शंका निर्माण होण्याला वाव मिळत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांना पत्र देवून देखील गुन्हा दाखल करण्यास होणारा विलंब या प्रकरणाला पोषक ठरत आहे.
अधिकार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने हा प्रकार होत असताना देखील प्रशासनाविरोधात सातत्याने शड्डू ठोकणारे भाजपा पदाधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. जिल्हा परिषदेला विविध घोटाळ्यांची मालिका असून ही निविदा प्रक्रिया राबवितांना काळजी घेण्याची आवश्यकता असताना देखील त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. बालक, महिलांना सकस आहाराचा पुरवठा करुन त्यांचे पोषण करणार्‍या प्रशासनाने मात्र ठेकेदाराचे पोषण केल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.