आदित्य ठाकरेंच्या यात्रेने शिवसेनेला बळ मिळणार?

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला गुरुवारी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात होत आहे, हे विशेष! जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपसेना युतीतर्फे भाजपच्या वाट्याला गेल्या असल्या तरी भाजप उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले यात युतीचेच यश म्हणता येईल. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी भाजप सेना- युती उमेदवाराला मतदान केले त्यांचे आभार मानणे आणि ज्यांनी मतदान केले नाही त्या मतदारांचे मतपरिवर्तन करणे असा आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले जात  असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही नांदीच म्हणता येईल. शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सेनेला युवा नेतृत्वाचा चेहरा दिला जातोय. शिवसेनेत आतापर्यंत  ठाकरे कुटुंबिय कधीच निवडणूक लढविली नाही. अथवा सत्तेतील पद घेतलेले नाही. परंतु यंदा प्रथमच युवा नेते आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह शिवसैनिकांतर्फे करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवरसुद्धा  आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला महत्व प्राप्त झाले आहे.

जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवला जात नसला तरी शिवसेनेचे संघटन जिल्ह्यात मजबूत आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेमध्ये जळगाव जिल्ह्याचे संघटन ठळकपणे दिसून येते. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या धाडसी नेतृत्वाबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कॅबिनेटमंत्री केले होेते. त्याचबरोबर विदयमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे तर हाडाचे शिवसैनिक असल्याने त्यांना सेनेची मुलुख मैदान तोफच संबोधले जाते. पाचोर्‍याचे माजी आमदार कै. आर. ओ. पाटील हे शिवसेनेतर्फे दोन वेळा पाचोरा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. आता त्यांचे पुतणे किशोर आप्पा पाटील हे आमदार असून पाचोरा मतदार संघात गेल्या 5 वर्षात 500 कोटींची विकासकामे करुन आघाडी मारली आहे. पारोळा विधानसभेच्या जागेवर चिमणराव पाटील गेल्या वेळी थोडाशा मताने पराभूत झाले असले तरी यंदा ते बाजी मारतील चोपड्यात शिवसेनेचे आ. चंद्रकांत सोनवणे आहेतच.

भाजप- सेनेची युती जाहीर झाली आहे. निम्म्या निम्म्या जागांवर भाजप- सेना लढणार असल्याचे सांगितले जाते. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 11जागा आहेत. त्यापैकी 6 जागा भाजपच्या असून 3 जागांवर सेनेचे आमदार तर 1 अपक्ष आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे 6 भाजप आणि 5 शिवसेनेला जागा द्यायच्या असतील तर त्या कोणत्या कोणत्या असतील हे महत्वाचे ठरणार आहे. कारण जळगाव विधानसभेच्या जागेवर 2014 चा अपवाद वगळता गेल्या 25 वर्षापासून सुरेशदादा जैन हे निवडून येत आहेत. त्यामुळे जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे जळगावच्या जागेचा तिडा शिवसेना- भाजप कशारितीने सोडविते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  अजुनतर भाजपसेना युतीमध्ये बिघाडी होईल, असे चित्र दिसत नाही. कारण भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्ये युतीच्या बाजूनेच होत असताना दिसतात. जिल्ह्यात सर्व उमेदवार युतीचेच उमेदवार विजयी होतील, असे जाहीर प्रचारात सांगतात, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेने भाजप- सेना संघटनेला बळच मिळणार असले तरी जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्याच्या जागेचा तिढा सोडविण्यासंदर्भात आदित्य ठाकरेंसमोर आव्हानच राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.