जामनेरची झाँकी जळगावात अवतरणे शक्य आहे का?

1

चांगभलं…

धों.ज.गुरव – 9527003891

ज़ामनेर नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्षासह सर्व 25 जागा जिंकून भाजपने विरोधकांचे पानीपत केले. शतप्रतिशत जागा जिंकणारी जामनेर न.प.महाराष्ट्रात एकमेव ठरली. त्यामुळे भाजपतर्फे करण्यात आलेल्या जल्लोषात जामनेर तो एक झॉकी है जळगाव अभी बाकी है, अशा घोषणा देत होते. जामनेरच्या निवडणूकीने भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढणे सहाजिकच आहे. तीन महिन्यावर येवून ठेपलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत जामनेरची मात्रा लागू होवू शकते. असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. जामनेर नगरपालिकेची तुलना जळगाव महानगरपालिकेशी करता येणार नाही. कारण गेल्या 25 वर्षापासून माजी मंत्री आ.सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वात खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. महापालिकेच्या मागील निवडणूकीच्या वेळी आ.सुरेशदादा जैन कारागृहात असल्याने ते प्रत्यक्ष निवडणूकीच्या प्रचाराच्यावेळी हजर नव्हते. तरीसुध्दा खाविआ बहुमतापर्यंत पोहचली होती. आता तर प्रत्यक्ष या निवडणूकीचे नेतृत्व ते स्वतः करणार असल्यामुळे ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाते.जळगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. त्यावर हरकतीही घेण्यात आल्या. निवडणूक आयोगातर्फे हरकतींवर विचारविनिमय करून प्रत्यक्ष पाहणीसुध्दा करणार आहेत. दरम्यान, नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढवू इच्छिणारे नविन उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आपल्या प्रभागात प्रचाराला लागले आहेत. भाजप-सेना यांच्या युतीसंदर्भातही चर्चेला उधाण आले आहे. या युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका असल्याचे सुरेशदादा जैन यांनी जाहीर सांगितले. तथापि, मुख्यमंत्र्यांनी युतीची संमती दिलीच नाही असे सांगून भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. आगामी महापौर भाजपचाच राहिल असेही जिल्हा भाजपतर्फे जाहीर करण्यात आले. भाजप-सेनेची युती दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना हवी आहे. परंतु ही युती फक्त नेत्यांना नको आहे. अशा प्रकारे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सांगत असतात. महापालिकेत असलेल्या एकूण 75 जागांपैकी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांत वाद होवू शकतात. आणि त्यावरून युती फिस्कटू शकते. युती झाली नाहीतर जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा, शिवसेना म्हणजे खाविआ आणि विद्यमान महापौर ललित कोल्हे यांच्या मनसेचा गट खाविआ बरोबरच राहून भाजपशी सामना करतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक तीसरे पॅनल होवून तिरंगी लढती होतील. भाजप, सेना यांच्या युतीबाबत निवडणूकीपर्यंत अशाच वावड्या उठत राहतील. भाजपचे जळगाव शहराचे आ.राजुमामा भोळे हे भाजपचे जिल्हा महानगराध्यक्षही आहे. भाजप-सेनेच्या युतीसंदर्भात परस्पर चर्चा होतेच. मी भाजपचा महानगराध्यक्ष असतांना याबाबतीत मला कोणी विचारतच नाही अशी आ.भोळे यांची खंत आहे. ति त्यांची खंत योग्यच म्हणावी लागेल. याचा अर्थ भाजपसुध्दा युती करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.
जामनेर नगरपालिकेत शतप्रतिशत विजय प्राप्त करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव महानगरपालिकेचे नेतृत्व आपसुक येईल असे म्हटले जाते. परंतु महाजन आणि एकनाथराव खडसे यांचेत असलेल्या विळ्याभोपळ्याच्या नात्यामुळे खडसे समर्थक कार्यकर्ते गिरीश महाजनांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यास उत्सुक नाही. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष भाग घेणार नसल्याचे नाथाभाऊंनी यापूर्वी जाहीर केले आहे. परिणामी जळगाव महापालिका निवडणूकीत भाजप कार्यकर्त्यांत अंतर्गत दुफळी निर्माण झाली आहे. भाजपला ही निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही. मध्यंतरी महाजन खडसे यांच्या नेतृत्वाला पर्यांय म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपतर्फे निवडणूक लढविण्यात येईल असे जाहीर झाले. परंतु चंद्रकांतदादांनी त्याचा इन्कार केल्यामुळे असे काही ठरलेच नाही असा खुलासा त्यांनी केल्याने भाजप कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.
गेल्या पाच वर्षात जळगाव शहरवासिय नागरी सुविधांच्या नावाने टाहो फोडत आहे. रस्त्यांची दुर्देशा कायम आहे. अनेक कॉलन्यांमध्ये रस्तेच झालेले नाही. शहरात असलेल्या प्रमुख रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते असा प्रश्‍न पडतो. खड्ड्यामुळे दुचाकी स्वाराचे अपघात होताहेत. रिक्षावाले सुध्दा हैराण झाले आहे. पादचार्‍यांना पायी चालणे कठिण झाले आहे. आरोग्याचा विचार केला तर नियमित साफसफाई होत नाही. अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विजेच्या बाबतीत म्हटले तर काही भागात अंधार असतो. रस्त्यावरील पथदिवे बंद असतात. पाणी दोन दिवसा आड मिळत असले तरी अधुनमधून सततच्या पाईपगळतीमुळे पाणी पुरवठ्यात खंड पडतो. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे जळगाववासियांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मुख्यमंत्र्याने 25 कोटी रूपये विकासकामांसाठी अडीच वर्षापूर्वी दिले. परंतु अडीच वर्षामध्ये भाजप नगरसेवकांच्या हट्टवादीपणामुळे ते वापरताच आले नाही.25 कोटी पैकी शिल्लक असलेल्या 17 कोटी रूपये वापरण्यावरून वाद झाला असल्यामुळे ते पडून आहे. मुख्यमंत्र्याने शहराच्या विकासासाठी दिलेले पैसे भाजप नगरसेवकांना वाटते की ते आमच्यासाठीच दिले आहेत.या सर्व हेव्यादाव्यामध्ये आणि वादामुळे शहरवासियांना वेठिस धरण्याचे कारण काय? शहरवासिय त्रस्त झालेले आहे. येत्या निवडणूकीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. जामनेर शहराबरोबर जळगावची तुलना करणे गैर आहे. पाहुया काय होते ते घोडा मैदान जवळच आहे. – 9527003891

1 Comment
  1. दिलीप जैन says

    नक्कीच भाजपा बाजी मारणार सर्वच जागा नव्हे परंतु बहूमत व महापौर भाजपचे असणार हे १००’/, सत्य आहे

Leave A Reply

Your email address will not be published.