*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली*

0
*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली*
डॉ. अविनाश आचार्य यांच्या पत्नी अनुराधा आचार्य यांचे शुक्रवारी रात्री ११ वाजता निधन झाल्याचे कळले. २५ मार्च २०१४ पासून दादांच्या निधनापश्चात मावशींनी त्यांची व दादांची भूमिका प्रामाणिकपणे निभावली. आचार्य परिवारातील एक सदस्य या नात्याने त्यांनी दिलेले प्रेम, सहकार्य नक्कीच दादांच्या तोडीचे होते. त्यांचा एक वेगळा आधार आम्हास वाटायचा. आशा फौंडेशनच्या कार्यक्रमांना येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची जबाबदारी आचार्य परिवार आनंदाने करीत. आचार्य-हुजुरबाजार परिवारात जातांना, आपले काम सांगतांना कधीही मनात हे कसे सांगावे असे आले नाही त्याला कारण कुटुंबातील सर्वांची स्वीकारार्हता ! *कोणतेही कार्य करीत असतांना दादांचे भक्कम पाठबळ असे आणि त्यांच्या पश्चात मावशींनीही ते दिले त्यामुळेच मावशींच्या जाण्याने दादांची सावली गेल्यासारखे वाटते.*
अतिशय शांत, निर्मळ व सात्विक विचारांच्या अनुराधा मावशी नेहमी हसतमुख असायच्या. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वास्तपुस्त करण्यात त्यांनी कधीही कमतरता केली नाही. दादांच्या व्यक्तिमत्वाला समरसतेने साथ देणाऱ्या मावशी दादांच्या सहवासाने तेव्हढ्याच संघ, समाज, देश आणि कार्यकर्ता यांचा विचार करायच्या. *त्यांच्या पिढीतील महिलांनी घेतलेल्या कष्टांमुळे स्वतःचा तर संसार उभा राहिलाच  मात्र त्याच जोडीला समाजाचाही संसार चांगला चालला असे नक्की म्हणता येईल.* दादा असतांना आणि त्यानंतरही अनेक वेळेस बोलतांना मावशींच्या निःस्वार्थ व निरागसतेचा परिचय येत असे. त्यांना कधी कंटाळलेले वा उदास पहिले नाही. जीवनातील सर्व प्रसंगांना कसे स्वीकारावे याचे मावशी हे जिवंत उदाहरण होते. अर्थात *त्यांनी आपले दुःख विसरून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला.*
दादांप्रमाणेच मावशींची विचारसरणी होती. समाजातील विशेषतः राजकारणातील भ्रष्टाचाराबद्दल त्यांना विशेष चीड होती. त्या अनेकवेळेस आपला संताप व चीड टीव्ही पाहतांना व्यक्त करीत असत. दहशतवादी हल्ले वा देशविघातक बातम्या पाहतांना त्या अस्वस्थ होत. दादांसोबत राहिल्याने त्यांचीही एक विचारसरणी विकसित झालेली पाहता येत असे. अनेक गोष्टींवर त्या बोलत असत. आशा महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या कलाकारांचे वास्तव्य दादांकडे होते. २६ जानेवारीचा दिवस असल्याने सकाळी परेड व अन्य कार्यक्रम टीव्हीवर सुरु होते. भारतरत्न व अन्य पुरस्कार वितरण सुरु असतांना मावशींनी त्यावेळेस म्हटले *नानाजी देशमुख यांना भारतरत्न दिले हे चांगले केले मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे होते.* मोदींकडून त्याची अपेक्षा होती.
घरी आलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्याबद्दल आचार्य व हुजुरबाजार परिवार ज्या पद्धतीने काळजी घेतो तशी आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचीही घेत नसू. सर्वच जण ती काळजी घेतात. सकाळच्या न्याहारीत जे पण काही बनविलेले असे ते मावशी स्वतः बनवीत आणि तेव्हढ्याच आग्रहाने आणि प्रेमाने वाढत असत. हे करीत असतांना कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही. *त्या खरोखरच ग्रेट आणि महान होत्या मात्र त्याची त्यांनी कुणाला कधीही जाणीव होऊ दिली नाही.* माणसे कर्तृत्वाने मोठी कशी असतात आणि दादांच्या भाषेत बोलायचे तर माणसाचं काम बोलतं तसंच मावशीचं होतं.
शिवमची त्या विशेष काळजी घेत. त्याला आवश्यक असलेला आत्मविश्वास देणे आणि त्याची सर्व प्रकारची काळजी त्या आवर्जून घेत असत. त्याच्या कलेचे त्यांना विशेष अप्रूप वाटत असे आणि त्याबद्दल त्या घरी येणाऱ्या प्रत्येकाशी अभिमानाने बोलत असत.
*आता केवळ आठवणी राहतील मात्र त्या आपल्या सर्वांना समृद्ध करतील, चांगलं  समाधानी व आनंदी जीवनासाठी प्रेरणा देतील.* आपण तसे जगणे हीच खऱ्या अर्थ्याने त्यांना श्रद्धांजली  ठरेल.
अनुराधा मावशींच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर सद्गती देईलच !आचार्य-हुजुरबाजार कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना !
*ॐ शांती शांती शांती !!*

Leave A Reply

Your email address will not be published.