90 लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धरणगाव शहरातील सोनवद रोड वरील दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी वाजागाजा करत उदघाटन केले, परंतु धरणगाव नगरपालिकेत सत्तेत असलेले सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव बदनाम करत आहेत. मंत्रीसाहेब देखील धरणगावात पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, त्यांचे धरणगावातील कच्चेबच्चे कशा पध्दतीने शासकीय निधीचा अपव्यय करत आहेत हे नागरीकांच्या आता लक्षात येत आहे.

90 लाख रुपयांचे शौचालय बांधून देखील ते पाच दिवसापासून बंद ठेवण्याची नामुष्की नगरपालिकेवर आली. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन त्यांना शौचास उघड्यावर बसावे लागत असून त्यामुळे आरोग्य देखील धोक्यात आहे. शौचालय बंदचे कारण नगरपालिकेतील मुख्याधिकारीकडे देखील नाही.  इतका भोंगळ कारभार शहरात सुरू आहे, नवीनच बनविण्यात आलेले शौचालय कश्यासाठी बंद आहे हे मुख्याधिकाऱ्यांना माहीत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

सोनवद रोड परिसरातील नागरीकांनी बंद शौचालयाविषयी भाजपकडे तक्रार केली असता भाजपचे पदाधिकारी शौचालयाची पाहणी करण्यासाठी गेले.  त्याठिकाणी पुरुष शौचालय पाच दिवसापासून बंद आहे अशी माहिती नागरिकांनी दिली. बंदचे कारण परिसरातील लोकांनी सांगितले की, लाईट बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालयाची बोरींग बंद असून पाण्याअभावी पुरुष शौचालय बंद ठेवण्यात आले आहे.

परंतु मुख्याधिकारी साहेबांना सर्व विषय माहीत असतांना देखील भाजपचे नगसेवक ललित येवले यांनी फोन लावला असता मला काहीही माहिती नाही, असे सांगितले. नगरपालिकेकडे लाइटबील भरण्यासाठी पैसे नाहीत तर एवढा खर्च करून शौचालय का बांधले? यांचे उत्तर सत्तेचा लाभ घेत असलेल्या नगरसेवकांनी द्यावे.

बंद असलेले पुरुष शौचालय लवकरात लवकर उघडावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल. सदर ठिकाणी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, अनिल महाजन, रवी पाटील इत्यादी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here