प्रयागराज- आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींनी योगी सरकारवर जोरदार प्रहार केला. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, या माध्यमातून त्या जास्तीत जास्त जनतेच्या संपर्कात येत आहेत. गांधी यांचा हा चार दिवसीय दौऱ्यावर अनेकांचा रोषही ओढावला आहे.
दरम्यान, सीतामढीमध्ये प्रियंका गांधींनी मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्ही शक्तिमान आहात, तुमची 56 इंचाची छाती आहे. मग रोजगार उपलब्ध करून का नाही दिलात, कारण हीच तुमची दुर्बलता आहे. हे कमकुवत सरकार आहे. पाच वर्षांत केंद्र सरकारने काहीही केलेले नाही, असाही टोला लगावला.
70 वर्षांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी मोदी सरकारला घेरलं. 70 वर्षांच्या रडगाण्यालाही एक्सपायरी डेट असते, हे विसरू नका, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. तर काल प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. चौकीदार हे गरीब शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.