56 इंची छाती असती तर कुलभुषणला सोडवले असते

0

कोळगाव येथील सभेत छगन भुजबळांची मोदींवर कडवट टीका

भडगाव –मोदींना 56 इंची छाती दाखवायची होती तर पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण जाधवला सोडून दाखवले असते, अशी कडवट टीका छगन भुजबळ यांनी आज येथे केली.

राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय(गवईगट)व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची जाहीर सभा शनिवारी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली. या सभेला विधान सभेचे माजीअध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाअध्यक्ष रवींद्र पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, माजी आ. राजीव देशमुख, माजी खा. वसंतराव मोरे, काँग्रेस जिल्हाअध्यक्ष संदीप पाटील, प्रदीप पवार, जगन सोनवणे, माजी आ. दिलीप वाघ, राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय वाघ, विनय जकातदार, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, खलील देशमुख, शामकांत पाटील, अ‍ॅड. अविनाश भालेराव, प्रशांत पवार, अ‍ॅड. विश्वास भोसले, संजय गरुड, नितीन तावडे, योजना पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप देशमुख, हर्षल पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, हे निकामी सरकार सैन्याआड लपायचे काम करत आहे . जे राफेल विमान आम्ही घेणार होतो तेच विमान जास्त किंमतीत हे सरकार घेत आहे. ज्यांनी खेळण्याचे विमान काढले नाही व 43 हजार कोटींची दिवाळखोरी असलेले ते काय हे विमान बनवतील? असा सवाल करत या शासनाने ओबीसींवर अन्याय केला आहे . यूपीएससीच्या अनेक जागा ओबीसींनी पास करून देखील घेतल्या जात नाही . ओबीसी मंडळाला एक रूपया दिला नाही. मला 5 जिल्हे दाखवा जेथे जनधन सुरळीत चालले, नोटबंदीचा त्रास झाला नाही, नोकर्‍या दिल्या, वीज निर्मिती केली. शहरे स्वच्छ केली, 5 किमी गंगा स्वच्छ केली . असे सांगत सरकारच्या निकामी योजनांची यादीच त्यांनी वाचून दाखविली.

जळगावचे 100 टीएमसी पाणी गुजरातला
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही ठरवले होते की ज्या राज्यात पावसाचे पाणी पडेल ते पाणी त्या राज्याचे. 191 टीएमसी पाणी जळगावचे असतांना केवळ 91 टीएमसी पाणीच अडवले गेले. 100 टीएमसी पाणी गुजरातकडे वाहून जात आहे.आम्हाला सूडबुद्धीने सरकारने जेलमध्ये पाठवले त्यामुळे विकासाची अनेक कामे राहून गेली . मांजरपाडा बोगद्याच्या उदाहरण देत राहिलेली कामे परत येऊन केली. सरकारने इकडचेच पाणी तिकडे करण्याचे अनेक एमओयु काढले आहेत, ते आम्ही महाराष्ट्रावर अन्याय म्हणून आमचं सरकार बसताच फाडून टाकू. सरकारने शेतकर्‍यांसह कष्टकरी मायबापांवर अन्याय केला आहे . अनेक शेती बाग येथे उध्वस्त झाल्या आहेत . शिवाय मोदी भक्तांना फ्रिजमधील बीफचा वास येतो मात्र इतक्या गाड्या चेक होत असताना जम्मूमधील 300 किलो आरडीएक्सचा वास आला नाही . हल्ल्या नंतर लगेच अमित शाह म्हणतात इतके मेले त्यात. हे का मोजायला गेले होते का? अशी जोरदार टीका त्यांनी मोदी व अमित शहांवर केली.

दरम्यान अरुणभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले.
माझ्यामुळे भाजपाने उमेदवार बदलला- गुलाबराव देवकर
जनतेने नव्या उमेदवाराकडून विकासाची कामे कशी होतात? हे पाहण्याची गरज आहे . मी जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केली. आज कुठेही गेलं तर मला माझ्या कामामुळे ओळखता मला नाव व ओळख सांगण्याची गरज नाही. माझी उमेदवारी जाहीर होताच भाजपला पेच पडला होता उमेदवार कोण द्यायचा , दरम्यान आपली पकड चांगली असल्यानेच त्यांना ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला . अमळनेरमध्ये गोंधळ झाला.असे सांगत मतदारांना आश्वस्त करत गुलाबराव देवकर पुढे म्हणाले की, मी जळगाव शहरात अधिक मताधिक्याने पुढे राहील ग्रामीण भागात तुम्ही मला पुढे ठेवा 5 वर्षात विकास झाला नाही तर सांगा . विकास नाही झाला तर पुन्हा तुमच्या कडे मत मागायला येणार नाही असे ठाम पणे सांगत त्यांनीआश्वस्त केले .

महिलांची सभेकडे पाठ
कोळगाव हे पारोळा, चाळीसगाव, भडगाव या तीन तालुक्यांना प्रवासाला सोयीचे आहे . शिवाय देवकर हे जळगाव येथील उमेदवार असल्याने उर्वरीत मतदार संघात त्यांनी ग्रामीण भाग टार्गेट केला आहे . त्यामुळे ही सभा भडगाव ऐवजी कोळगाव येथे आयोजित करण्यात आली होती . मात्र या सभेस पाहिजे तशी गर्दी मिळाली नाही, मात्र भुजबळ येणार म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माळी समाजातील समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उन्हामुळे महिलांनी या सभेकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली . बोटावर मोजव्यात एवढीच महिलांची उपस्थिती होती .

या सरकारच्या अनेक योजनांची मा. कोर्टाने दखल घेत या सरकारला फटकारले आहे. त्याचा बातमीचा पुरावा व गुजरातला पाणी देण्याबाबतच्या बातमीचे कात्रणं व इतर माहिती भुजबळ यांनी सभेत उंचावून जनतेला पुरवा म्हणून दाखवली .

Leave A Reply

Your email address will not be published.