नवी दिल्ली: मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बीएसएफचे निलंबित करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मला 50 कोटी द्या. मोदींना ठार करतो, असं तेजबहादूर यादव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ म्हणजे माझ्या विरोधात रचण्यात आलेला कट असल्याचं तेजबहादूर यादव यांनी म्हटलं आहे.
तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत आपणच असल्याचं यादव यांनी मान्य केलं आहे. मात्र हे आपल्या विरोधात रचण्यात आलेलं कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला. यावरुन भाजपानं तेजबहादूर यांच्यावर सडकून टीका केली. ‘समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिलेल्या तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ पाहून आम्हाला धक्का बसला. सपानं त्यांना वाराणसीतून उमेदवारी दिली. मात्र काही कारणांमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आता ते 50 कोटींसाठी मोदींच्या हत्येचा कट रचताना टीव्हीवर दिसत आहेत,’ अशा शब्दांत भाजपाचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं 1 मे रोजी बाद ठरवला. बीएसएफनं केलेल्या कारवाईची माहिती न दिल्यानं यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. भ्रष्टाचार किंवा निष्ठेवर शंका उपस्थित करुन बीएसएफमधून निलंबन न झाल्याची कागदपत्रं जमा न केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला.