4 जूनला मान्सून केरळमध्ये : महाराष्ट्रातील आगमन लांबणार

0

नवी दिल्ली – मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यंदा देशभरात मान्सूनची वाटचाल संथ राहील. काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. पूर्व, ईशान्य आणि मध्य भारताच्या काही भागात देशातील इतर भागांच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी असण्याची शक्यता स्कायमेटच्या अहवालात नमूद करण्यात आलेय.

22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं स्कायमेटचे शास्त्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी सांगितल आहे. यापूर्वी स्कायमेटने राज्यात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, आता स्कायमेटच्या नव्या अंदाजानुसार मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भवासियांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. भारतातील जवळपास 70 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे स्कायमेटच्या नव्या अंदाजाने शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.