पुणे
अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. तब्बल ३९ पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३९ पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. कालच शरद पावर गटाला आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यांनतर हा ३९ नेत्यांच्या प्रवेशाने राज्यातील राजकारणावर मोठा फरक पडणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशाची तारीख आणि वेळीही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अजित पवार गटाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. अश्यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटात छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी १८ नेत्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. आज राष्ट्रवादीत शरद पवार गटात ३९ नेत्यांचा प्रवेश ही महाविकास आघाडीची ताकद वाढवणार हे निश्चित आहे.
काय म्हणाले शरद पवार..
मागच्या काही दिवसांपासून पिंपरीतील काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, “पक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही. पण जयंत पाटील यांना भेटले आहेत. याची मला माहिती आहे.” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
दादांच्या बालेकील्याला भगदाड
पिंपरी- चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधीही पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्याचमुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांना हा मोठा धक्का बसला आहे.