मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 लवकरच संपणार असून या अशा परिस्थितीत काही अशी कामे आहेत जी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. जर आपण ही कामे दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण केली नाहीत तर भारी दंड भरावा लागणार आहे. करासंबंधी काही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे.
अशात, 31 मार्च 2021 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला जोडले जाणे आवश्यक आहे. आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. तसेच आधारला पॅन कार्ड जोडलेले नसले आणि तरीही त्याचा कुठे उपयोग केल्यास दंडसुद्धा होऊ शकतो. हा दंड 10 हजार रुपये इतका असू शकतो.
पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2021 रोजी निश्चित केली. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी जोडले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय होते. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10000 रुपये दंड आकारला आहे. प्राप्तिकर विभागाने यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोरोना साथीच्या कारणास्तव वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे आवश्यक कागदपत्र नूतनीकरण न केल्यास 31 मार्चनंतर तुमच्याकडून दंड आकारला जाईल. म्हणून लवकरच सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करून घ्या.
31 मार्च हा आर्थिक वर्ष 2020-21 चा शेवटचा दिवस आहे. ही तारीख 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख असेल. कोणत्याही आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आईटीआर) फाईल करण्याची मूळ डेडलाईन संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न फाइल केली जाते, मात्र यासाठी करदात्यांना दंड भरावा लागतो. बिलेटेड आयटीआर 10 हजार रुपयांच्या लेट फायलिंग फीसोबत 31 मार्च 2021 या तारखेच्या आधी जमा करावा लागतो.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. यामुळे तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले का याची खात्री नक्की करा.
आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.