शिरपूर-जळगाव बसमधील प्रकार ः जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
जळगाव, दि.22 –
शिरपूर ते जळगाव दरम्यान बसमध्ये अस्थिव्यंग असल्याचे बनावट कार्ड दाखवून प्रवास करणार्या प्रवाशाला वाहकाने पकडले. प्रवाशाकडे मिळून आलेले कार्ड बनावट असल्याने त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांच्याविरुध्द राज्य मार्ग परिवहन मंडळाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एस.टी. बसमध्ये वनफोर टिकीट सवलत घेण्यासाठी अपंगाचे बनावट पास तयार करून देणार्या टोळीचा नुकताच सिल्लोड शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान हे सर्व पासेस औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून तयार करण्यात असल्याचे तपासात समोर आले आहे.
वाहकाच्या हुशारीने प्रकार उघड
रविवारी सकाळी चालक प्रभाकर सोनवणे व वाहक गोपाल पाटील हे बस क्रमांक एमएच.14.बीटी.3911 घेवून शिरपूरकडून जळगाव जळगावकडे येण्यास निघाले. दरम्यान चोपडा तालुक्यातील सावखेडा येथून अविनाश पुंडलिक कदम वय 41 रा.सुर्यवाडी, हर्सुल ता.जि.औरंगाबाद हे जळगाव येण्यासाठी बसले. त्यांनी वाहक गोपाल पाटील यांना तिकीट काढतांना औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाचे 50 टक्के अस्थिव्यंग असलेले कार्ड दिले.
जिल्हापेठ पोलिसात
आणली बस
पूर्ण तिकीट काढण्यास कदम यांनी नकार दिल्याने वाहक गोपाल पाटील यांनी चालकास बस जिल्हापेठ पोलिसात घेण्यास सांगितले. याठिकाणी अविनाश कदम यांना जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर कदम यांनी जामनेर येथील ए.बी.पाटील यांच्याकडून 1200 रुपयांत अस्थिव्यंग असल्याचे कार्ड बनविल्याचे सांगितले. त्यावरून जळगावात देखील टोळी सक्रीय असल्याची खात्री परिवहन विभागाला झाली आहे.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
राज्य मार्ग परिवहन मंडळाची फसवणुक केल्याप्रकरणी वाहक गोपाळ पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात अविनाश पुंडलिक कदम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.