लोकशाही न्यूज नेटवर्क

भिवंडी तालुक्यातील जानवळ येथे ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 306 जिलेटिन कांड्या, 110 डेटोनेटर तसेच स्फोटकांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी असलेली रजिस्टर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना स्फोटक साहित्य साठवून ठेवल्याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे भिवंडीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक विलास पाटील यांचे बंधू नितीन रघुनाथ पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अक्षय रोड्डेवार, वीरेंद्रकुमार सिंग, वसंत लोणे, नितीन पाटील, शत्रुघ्न चव्हाण, दिनेश पाटील आणि मनीष पाटील यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामध्ये नितीन पाटील यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या साठ्याचा वापर नेमका कोणत्या कामासाठी केला जात होता? तसेच त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास ठाणे गुन्हे शाखा आणि पडघा पोलिस करत आहेत. माजी महापौरांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे भिवंडीमध्ये खळबळ उडाली आहे.


