सोलापूर
लाडक्या विठ्ठलाला राज्यातील भाविक आपल्या परीने दान करीत असतात. याच प्रकारे नांदेड येथील एका भाविकाने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चांदीने मढविण्याचे कबूल केले आहे. यामुळे चांदीचा दरवाजा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व दरवाजे चांदीचे करण्याचा प्रयत्न असणार आहे.
पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलभेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर प्रशासनाकडे देणगी स्वरूपातही रक्कम दिली जाते. अनेकदा दानपेटीला मौल्यवान वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्या वतीने या दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी 30 किलो चांदी लागणार असून, याची किंमत जवळपास 30 लाख रुपये आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून, या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ मंदिराचा दरवाजा चांदीचा करणार आहेत. दरवाजाला चांदी बसविण्याच्या कामामुळे सध्या येथून भाविकांना प्रवेश बंद असून, मुखदर्शनाची रांगदेखील रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे.