लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तरखंडमधील अल्मोड येथे ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झालेय.
मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत.
४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून बाहेर आले. काही लोक बिथरून खाली पडले. या अपघातमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.