24 लाख मतदार ठरविणार जि.प, पं.सची सत्ता!
गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर : 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर
जळगाव : आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची हालचाल सुरु झाली असून इच्छुकांनी गुडघ्या बाशिंग बांधून तयारी देखील केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 24 लाख मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता कुणाच्या हाती द्यावी हे ठरविणार आहे. प्रशासनातर्फे गट गणांमध्ये मोठा उलटफेर करण्यात आल्याने ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र आहे. गट, गणांची प्रारुप रचना जाहिर झाल्याने राजकीय फड रंगण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून जिल्हा प्रशासनाकडून गट- गणांची प्रारूप रचना जाहिर करण्यात आली आहे. जिल्ह्याची गटसंख्या ही 68 करण्यात आली असून गणांची संख्या देखील 136 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 68 गटांचे सदस्य निवडून येणार आहेत. विषेश म्हणजे गट-गणांमध्ये मोठे बदल झाले असून गावांमध्ये उलटफेर झाले आहे. त्यामुळे हरकतींसाठी आता पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून निवडणुकी पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा पहिला टप्पा प्रारूप गट-गण रचना जाहिर झाल्याने सुरू झाला आहे. शासनाने 18 ऑगस्टपर्यंत गट व गण रचना पुर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
गट व गणांसाठी निवडणूक आयोगाने 2017 च्या निवडणुकांचे निकष कायम ठेवले आहे. त्यानुसार गटांतील मतदार संख्या 40 हजार तर गणांतील मतदार संख्या 20 हजारपर्यंत ठेवण्यात आल्याने गटांच्या गावात उलटफेर झाला आहे. विषेश म्हणजे अनेक गटांची नावे बदलली असून गावांमध्ये देखील उलटफेर झाले असल्याने आता राजकीय गणिते व समिकरणे देखील बदलणार हे मात्र निश्चित झाले आहे.
भादलीला जोडली अनेक गावे
जळगाव तालुक्यात नशिराबाद नगरपंचायत झाल्याने नशिराबाद गट आता भादली-कुसुंबा झाला असून त्या गटात असोदा व शिरसोली गटाची काही गावे जोडण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताईनगर-निमखेडा गट कमी झाला आहे. त्यात गटातील गावे अन्य दोन गटांमध्ये जोडण्यात आली आहे. जामनेर तालुक्यात शेंदुर्णी नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे त्या गटातील गावे अन्य गटांमध्ये जोडण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यात यापुर्वी 7 गट व 14 गण होते. मात्र यात एक गट व गण वाढला आहे. अमळनेर तालुक्यात देखील 4 गट व 8 गण होते. यात देखील 1 गट व एक गण वाढला आहे. त्यामुळे पूर्वीच्या गटांमधील गावांमध्ये उलटफेर झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात या पुर्वीच्या 2017 च्या निवडणुकीत 4 गट व 8 गण होते. मात्र नविन रचनेनुसार 3 गट व सहा गण होणार आहे. मुक्ताईनगरमध्ये ग्रामिणचा काही भाग नगरपंचायतीला जोडला गेला असल्याने येथे एक गट कमी झाल्याचे मानले जात आहे.
नविन रचनेनुसार जिल्ह्यात एक गट वाढणार आहे. त्यात अमळनेर तालुक्यात गेल्या निवडणुकीत चार गट होते. आता तेथे पातोंडा-दहिवद या एक गटाचे दोन गट झाले आहेत. आता तालुक्यात पाच गट होणार आहे. तसेच पंचायत समितीच्या दोन गणांची देखील वाढ होणार आहे. तसेच या पूर्वी चाळीसगाव तालुक्यात 7 गट होते. आता एक घोडगाव हा गट वाढून 8 गट होणार असून 2 गणांची देखील वाढ होणार आहे. गट व गणांची प्रारूप रचना जाहिर झाल्याने आता दि. 21 जुलै पर्यंत हरकतीला वेळ देण्यात आला आहे. अंतिम गट रचना 18 ऑगष्ट रोजी अंतिम केली जाणार आहे. चोपडा तालुक्यात पूर्वीच्या विरवाडे गटात काही गावांमध्ये बदल झाले आहे. अन्य 4 गटांमध्ये उलटफेर झाला असून गणितेच बदलली आहे. गट व गण या दोघांची रचना अन्य गट, गणांशी जोडल्याने चोपडा तालुक्यात सर्वाधिक बदल झाल्याचे दिसते.
आरक्षणाकडे लागले सर्वांचे लक्ष
जिल्हा परिषदेच्या 68 गट व 136 गणांची अंतिम रचना दि. 18 ऑगष्टला जाहिर होईल. मात्र आता महत्वपूर्ण टप्पा पार पडल्यानंतर आता सर्व इच्छुकांकडून आता आरक्षणाची प्रतिक्षा आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतरच र्इच्छुकांसाठी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा अंदाज आतापासून लावला जात आहे. कोणत्या गटात व गणात या पूर्वी कोणते कोणते आरक्षण होते? आता लोकसंख्येच्या निकषावर कोणते आरक्षण निघेल याचे आडाखे बांधले जात आहे.
प्रशासनाची तयारी सुरु
जळगाव जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून 3 हजार 231 कंट्रोल-बॉक्स आणि 3 हजार 332 बॅलेट युनिट्स प्राप्त झाले असून, त्यांची तपासणी दि. 22 जुलै रोजी तहसील कार्यालयांमध्ये होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रासाठी मागणी केली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे 24 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. दसऱ्या-दिवाळीनंतर निवडणुकांच्या प्रचाराला प्रारंभ होर्इल अशी शक्यता आहे.