जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे 24 एप्रिल रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सुमारे 2100 हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
ही विशेष मोहीम सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत राबविण्यात आली. जिल्हयातील सर्व महत्त्वाच्या 59 नाकाबंदी पॉइंट्सवर पोलिसांनी कडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेसाठी 48 पोलीस अधिकारी आणि 216 पोलीस अंमलदारांचे मोठे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात सुमारे 2100 ते 2200 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत 374 केसेस नोंदवण्यात आल्या असून, एकूण 2,38,650/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 46 टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या 13 व्यक्तींवर एकूण 15 केसेस करण्यात आल्या आहेत. जळगाव शहर (एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर), भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव आणि पाचोरा या विभागांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी अशा मोहिमा उपयुक्त ठरत असून, नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


