21 वर्षांनंतर भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’; हरनाज संधूची बाजी (व्हिडीओ)

0

‘मिस युनिव्हर्स २०२१’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने आपले नाव कोरले आहे.  ही सौंदर्यस्पर्धा इस्रायलमध्ये संपन्न झाली.

२००० मध्ये हा किताब अभिनेत्री लारा दत्ताने पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात आणला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले. “आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल”, असा प्रश्न टॉप ३ राऊंडमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली, “स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलुयात. तुम्ही समोर या, इतरांशी बोला.. कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आजा मी याठिकाणी उभी आहे.”

“बर्‍याच लोकांना असं वाटते की हवामान बदल ही फक्त फसवणूक आहे. अशा लोकांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?”, असा प्रश्न ‘टॉप ५’ स्पर्धकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावरील उत्तराने हरनाजने परीक्षकांची मनं जिंकली. “निसर्गासमोर असलेल्या असंख्य समस्या पाहून मला फार दु:ख होतं आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे आहे. आता कमी बोलण्याची आणि प्रत्यक्षात कृती करण्याची खरी वेळ आहे. कारण आपली प्रत्येक कृती ही निसर्गाला वाचवू तरी शकते किंवा त्याचा नाश करू शकते. पश्चात्ताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणं कधीही चांगलं”, असं उत्तर तिने दिलं.

हरनाजने २०१७ मध्ये ‘टाइम्स फ्रेश फेस’ या सौंदर्यस्पर्धेतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. २१ वर्षीय हरनाज सध्या पब्लिक  अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने ‘फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९’चा किबातसुद्धा आपल्या नावे केला आहे. हरनाजने काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.