नवी दिल्ली | वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज त्यांनी या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी नवीन वर्षात 2021 मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी कामना आपण करुयात असा संदेश दिला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत त्यांचं कौतुक केलं. 2020 या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं आहे, असंही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण mygovindia वर पाठविलेल्या सूचनासुद्धा माझ्यासमोर आहेत. अंजली यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया, असं मोदींनी म्हटलं. तर मुंबईच्या अभिषेक जी यांनी नमोॲप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2020 ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.