खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सला एसटी देणार आधुनिक पर्याय; लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मिळणार आरामदायी प्रवास
जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच २०० वातानुकूलित (एसी) व्होल्वो बस दाखल होणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या बससेवेमुळे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सला एसटीकडून पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
नवीन बस कोणत्या मार्गांवर सुरू करायच्या, यासाठी प्रवाशांची मागणी, प्रवासाचे अंतर, कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर मार्ग निश्चित केले जातील. नव्या बसमध्ये आरामदायी आसने, डिजिटल सुविधा, मोबाइल चार्जिंगसह प्रवाशांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
तिकीट आरक्षणासाठी डिजिटल बुकिंग व्यवस्थेला प्राधान्य दिले जाणार असून, प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढता येण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
एसटीची सेवा सुरक्षित आणि तुलनेने परवडणारी असल्याने नव्या एसी बसच्या भाड्याकडेही प्रवाशांचे लक्ष लागले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र प्रवाशांना सवलती लागू राहणार का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. नव्या बससेवेमुळे एसटीच्या प्रवासाला आधुनिक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

