नाशिकमधील २ जवानांनी केली १५ लाखासाठी देशाशी गद्दारी
शस्त्रास्त्रांची माहिती, नकाशे आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली
लोकशाही न्यूज नेटवर्क
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील २ जवानाना पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. तर तिसरा संशयित जवान नाशिकच्या छावणीतून फरार झाला आहे. १५ लाख रुपयांसाठी या जवानांनी गद्दारी केली. पैसे घेऊन त्यांनी शस्त्रास्त्रांची माहिती, नकाशे आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली.
अटक करण्यात आलेले जवान आणि फरार जवान हे तिघेही पंजाबचे आहेत. सुटीवर गावी आल्यानंतर ड्रग्स आणि शस्त्र विक्री रॅकेट चालवत असल्याचं देखील पंजाब पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी आरोपींचे ३ मोबाईल जप्त केलेत. सध्या फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून पंजाब पोलिसांनी नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमधील २ जवानांना त्यांच्या मूळ गाव पटियालातून अटक केली. आर्टिलरी सेंटरमधील शस्त्रास्त्रांची माहिती, लष्करी छावण्यांचे नकाशे हे दोघे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवत होते. या जवानांना पाकिस्तानकडून १५ लाख रुपये मिळाल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान, दोघेही हेरॉइनसारखे ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवत असल्याचेही माहिती तपासातून उघड झाली आहे.
संशयित अमृतपाल सिंह आणि संदीप सिंह अशी अटक करण्यात आलेल्या जवानांची नावे आहेत. नाईक पदावर असलेले दोघेही सुटीवर गावी गेले होते. अमृतसर पोलिस अधीक्षक हरिंदर सिंह आणि एसएसपी चरणजितसिंह सोहल यांच्या माहितीनुसार, ४ फेब्रवारी रोजी ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून घरिंठा पोलिसांनी तिघांना अटक केली होती. यामध्ये संशयित अमृतपाल सिंह या लष्करी जवानाचा सहभाग आढळून आला. त्याच्याकडून ५०० ग्रॅम ड्रग्ज आणि १० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. चौकशीत तो देवळाली कॅन्टोन्मेंट येथे नियुक्तीला असल्याचे समोर आले. त्याच्याकडील मोबाइलच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
अमृतपाल सिंह आणि संदीप सिंह या संशयितांच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी आणि कॉल डिटेल्सद्वारे त्यांचे सैन्य दलातील आणखी दोघांशी संबंध असल्याचे समोर आले. आयएसआयच्या एजंटशी दोघांचा संपर्क होता. आर्टिलरी सेंटरची अंतर्गत छायाचित्रे, नकाशे, यापूर्वी काम केलेल्या लष्करी छावण्यांचे छायाचित्र, शस्त्रास्त्रांची माहिती, लष्करी अधिकाऱ्यांचे फोटो त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे त्यांनी पाकिस्तानला पाठवले. ते या माध्यमातूनच ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवायचा. दोघेही सुटीसाठी १० ते १५ दिवसांच्या फरकाने यायचे आणि गावी आल्यावर ड्रग्ज आणि शस्त्र विक्रीचे रॅकेट चालवायचे, अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपी संदीप सिंहकडून ३ मोबाइल जप्त करण्यात आले असून एकाचा शोध सुरू आहे. त्याने आयाएसआय संस्थेला लष्करी माहिती पुरवल्याचा संशय आहे. मोबाइलमधील डाटा रिकव्हर करून फॉरेन्सिक तपास सुरू आहे. मास्टरमाइंड राजबीर सिंगला अटक करून करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकमध्ये त्याचा शोध घेतला जाईल. त्याने कधीपासून आणि किती गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवली याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.