जळगाव, दि.20 –
शहरातील शनिपेठ परिसरात असलेल्या मायक्कादेवी मंदिरासमोरील बटाटा गल्लीत सुरु असलेल्या बांधकामठिकाणी बिल्डींगच्या तिसर्या मजल्यावरून पडल्याने सेट्रींग काम करणार्या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 11.45 वाजेच्या सुमारास घडली.
मायक्कादेवी मंदिरासमोर असलेल्या बटाटा गल्लीच्या कोपर्यावर लक्ष्मण माधव चौधरी यांच्या इमारतीचे काम सुरु आहे. त्याठिकाणी भगवान चंदू मिस्तरी हे ठेकेदार म्हणून काम पाहत आहे.
बल्ली तुटल्याने खाली कोसळला
इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या गच्चीच्या भिंतीला प्लॅस्टर करण्याचे काम मंगळवारी सुरू होते. त्याठिकाणी काम करीत असलेल्या सुपडू दिलीप सपकाळे वय-28 रा. पिंप्राळा हुडको याच्या मागील लाकडी बल्ली अचानक तुटली. त्यामुळे तो 30 फुटावरून खाली कोसळला. घराखालीच असलेल्या मंदिराच्या चौफेर लावलेले लोखंडी रॉड त्याच्या डोक्याला व पोटाला लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच इतर मजुरांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तात्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मयत घोषित केले. याबाबत शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात फोडला हंबरडा
मयत सुपडू याच्या वडीलांचे निधन झाले असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. घरातील मुख्य कर्ता पुरूष तोच होता. त्याच्या मृत्यूची माहिती कळताच त्याची आई लताबाई, पत्नी उज्वला, लहान भाऊ शंकर व सुनिल यांच्यासह विवाहित बहीण व नातेवाईक व मित्र परिवारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सर्वांनी एकच आक्रोश केला.
चिमुकलीलाही अश्रू अनावर
मयत सुपडू याला चार महिन्यांची मुलगी असून पतीच्या निधनाची माहिती मिळताच तिने मुलीसह जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. यावेळी तिने मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला. काही कळत नसलेली चिमुकली देखील रूग्णालयात रडत होती. दुःखात असलेला प्रत्येक नातेवाईक स्वतःचे अश्रू पुसत तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते.
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज केली होती कामाला सुरूवात
गेल्या 15-20 दिवसांपासून सुपडू हा घरीच होता. मंगळवारी त्याला काम मिळाले असल्याने सकाळी त्याची आई लताबाई व पत्नी उज्वला हिने त्याला डब्बा बनवून दिल्यानंतर तो कामावर आला होता.