बनावट कॉल सेंटरचे तीन राज्यात सिंडिकेट!
माजी महापौरासह ८ जणांना पोलीस कोठडी; हवालामार्गे येत होता ‘क्रिप्टो’चा पैसा
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरच्या सिंडिकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सिंडिकेटची पाळेमुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालपर्यंत पसरलेली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परदेशी नागरिकांना अॅमेझॉन, बँक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांसह एकूण आठ संशयितांना न्यायालयाने ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी रविवारी छापा टाकून या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ३१ लॅपटॉप, ७ मोबाईल आणि इंटरनेट तसेच कॉल सेंटरसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी राकेश आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र अगारिया, आदिल सैय्यद निशार अहमद सैय्यद, इम्रान अकबर खान, मोहम्मद जिशान नूरी पिता मो. नूर आलम, शाहबाज आलम मो. शाहबउद्दीन, साकीब आलम शहाबउद्दीन, मोहम्मद हाशिर मोहम्मद राशिद यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीचा पैसा ‘क्रिप्टो’द्वारे हवालामार्गे
या कॉल सेंटरमधून फसवणूक करून मिळवलेले परकीय चलन सायबर ठग क्रिप्टो करन्सीमध्ये खरेदी करत होते. त्यानंतर हा पैसा मुंबईतील एजंटमार्फत हवालामार्गे भारतात मागवून भारतीय चलनामध्ये रूपांतरित केला जात होता. यामुळे या गुन्ह्याच्या तपासाला आता वेगळे वळण लागले आहे.
माजी महापौरांचा सहभाग उघड
माजी महापौर ललित कोल्हे हे या सिंडिकेटमध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते. मुख्य सूत्रधार असलेले संशयित आदिल सैय्यद निशार अहमद व अकबर हे जळगावला आल्यावर त्यांच्या राहण्याची सोय कोल्हे यांनी केली होती. शहरातील हॉटेल प्रेसिडेंटमधील रूम्स कोल्हे यांनी बुक करून त्याचे पैसे देखील भरले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. नितीन गणापुरे यांनी न्यायालयात दिली.
कोल्हेंच्या गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी
माजी महापौर ललित कोल्हे यांच्यावर यापूर्वीच तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. तसेच, अटक केलेल्या संशयितांचे मोबाईलमधील सिमकार्ड बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेले असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलिस आता फसवणुकीसाठी ग्राहकांचा डेटा कोठून मिळवला, तसेच संशयितांना बोगस कॉल सेंटर चालवण्यासाठी एक्स लाईट आणि व्हीपीएनसारख्या नेटवर्क वापरण्याचे प्रशिक्षण कोणी दिले, याचा शोध घेत आहेत. जप्त केलेले लॅपटॉप नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार असून त्यातील संपूर्ण डेटा कॉपी करून फसवणूक झालेल्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
तसेच, मुंबई व कोलकात्यातील कामगारांना नोकरीवर घेण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर झाला, याचाही पोलीस तपास करणार आहेत.

