चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
अडावद पोलिसांनी देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात अवैध गांजा शेतीवर धडक कारवाई करत १७५ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात एका शेतात गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाड टाकली.
पंचांसमक्ष शेताची पाहणी केली असता गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा केला. यावेळी शेतातील लहान-मोठी अशी एकूण १७५ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणातील संशयित देवसिंग रावल्या बारेला हा मूळचा सिंदखेडी, ता. वरला, जि. बडवानी (मध्य प्रदेश) येथील असून, सध्या देवगड, अनेर नदीच्या किनारी, ता. चोपडा, जि. जळगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, चोपडा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि प्रशांत कंडारे, ग्रेड पोउपनि जितेंद्र सोनवणे, सफौ नासिर तडवी, पोहेकॉ संजय धनगर, विनोद धनगर, शेषराव तोरे, भारत नाईक, किरण शिरसाठ, पोकॉ भूषण चव्हाण आणि मपोकॉ दिव्या मराठे सहभागी होते.

