
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. त्यामुळे आता जळगावच्या राजकीय रिंगणात चुरस कमालीची वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक निर्णय प्रक्रिया अंतर्गत आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी आढळून आल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने संबंधित उमेदवारांना या त्रुटींबाबत तातडीने लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी या त्रुटींची पूर्तता केल्याने अखेर छाननी अंती सर्वच्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. एकही अर्ज बाद न झाल्याने सर्व इच्छुकांचा निवडणुकीत लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर छाननीअंती सर्व १६ अर्ज वैध ठरले असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
रोहन घुगे, जिल्हाधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी
या निवडणुकीत आता भाजप, महाविकास आघाडी आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह काही प्रमुख बंडखोरांनीही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुरंगी होणार असल्याचे चित्र आहे. बंडखोरी थोपवण्यात पक्षांना यश येते की निवडणूक रिंगणात मोठी उलथापालथ होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
घोषित वेळापत्रकानुसार, या विधान परिषद जागेसाठी १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उरतात आणि जळगावचा गड कोण राखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज भरलेले उमेदवार
- भाजप – नंदकिशोर महाजन (तांदलवाडी, ता. रावेर)
- महाविकास आघाडी – शरद तायडे (जळगाव शहर)
- अपक्ष- अनिल चौधरी, सचिन चौधरी (भुसावळ)
- नीलेश चौधरी (जळगाव ग्रामीण)
- प्रवीण गंगाराम पाटील (अमळनेर)
- असिफ मोहमंद दारा मोहंमद (रावेर)
- सुनील जंगले (मुक्ताईनगर)
- शेख दानिश शेख निसार (रावेर)
- जावेद इक्बाल अब्दुल रशीद (जामनेर)
- रेश्मा काळे (जळगाव)
- दीपक धांडे, नीलेश झोपे (दोघे भुसावळ)
- कलीमखान हैदरखान मणियार (फैगपूर)
- हितेंद्र देशमुख (चोपडा)
- घृष्णेवर पाटील (चाळीसगाव)

