16 वर्षीय मुलाची आत्महत्या; पंतप्रधानांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

ग्वालियर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नैराश्यामुळे अनेक आत्महत्येचे प्रकरण समोर येतात.  अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने नैराश्यात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील ग्वालियर शहरात घडली आहे. आत्महत्येपु्र्वी या मुलाने सुसाईड नोट लिहली असून त्याने मरणानंतर आपली इच्छा पुर्ण व्हावी यासाठी पंतप्रधानांकडे सुसाईड नोटच्या माध्यमांतून विनंती केली आहे.

ग्वालियर येथील कॅन्सर रुग्णालय पर्वतरांगा येथील मौनी बाबा मंदिराजवळ 16 वर्षीय मुलगा वास्तव्यास होता. त्याला डान्सर व्हायचे होते. मात्र कुटुंबियांचा याला विरोध होता. त्यामुळे तो  नेहमी दु:खी राहत होता. आपले स्वप्न पूर्ण होणार नसल्यामुळे नैराश्यात गेला. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपविले आहे.

या घटनेची माहिती मिळताच झांसी रोड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोलिसांना त्याच्याकडे सुसाईड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमध्ये थेट पंतप्रधान मोदींकडे आपली अंतिम इच्छा बोलून दाखवली आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, ‘ केंद्र सरकारने माझीही अंतिम इच्छा पूर्ण करावी, मला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे, माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर एक गाणं तयार करण्यात यावं. नेपाळचे रहिवाशी असलेले माझे आवडते डान्सर सुशांत खत्रींनी या गाण्याची कोरिओग्राफी करावी. हे गाणं देशातील सर्वात मोठे गायक अरजितसिंग यांनी गावं. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी पंतप्रधानांनाही विनंती करतो की, त्यांनी माझी इच्छा पूर्ण करावी.’

तसेच त्याने सुसाईड नोटमध्ये आई-बाबांचीही माफी मागितली आहे. मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. मी स्वार्थी आहे, जो कुटुंबाला सोडून जात आहे. चांगला डान्सर व्हायची माझी इच्छा होती, मात्र मला कुणीही सपोर्ट केला नाही. मी माझ्यासोबत अनेक गुपितं घेऊन जात आहे, असेही त्याने  लिहिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here