लोकशाही न्यूज नेटवर्क
अंमली पदार्थविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्ब्ल १३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथून पाथर्डीकडे जाणाऱ्या एका वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मिरजगाव ते कर्जत रोडवरील महात्मा फुले चौक येथे पोलिसांनी सापळा रचला. ठरलेल्या प्लॅननुसार स्कॉर्पिओ मधून जाणाऱ्या गणेश कराड आणि सुखदेव कदम यांच्या गाडीची तपासणी केली असता डिक्कीत चार गोण्या आढळून आल्या. या गोण्यांमध्ये एकूण १३२.८४ किलो ग्रॅम अंमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी १८ लाख १८ हजार रुपये किमतीचा गांजा, २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन असा एकूण २५ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक करावाया सुरु केल्या असून गेल्या तीन दिवसात MD ड्रग्ससह पोलिसांनी गांजा तस्करीची ही मोठी कारवाई केली आहे.

