नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरू आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत जर आपण पाहिले तर सोन्याच्या किमतीत सुमारे 11000 रुपयांपेक्षा जास्त घट झालीय. आतापासून एप्रिल महिन्यापासून लग्नाचा मोसम सुरू होणार आहे. तर लग्नाच्या मोसमात आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे, कारण केवळ एका महिन्यात सोने सुमारे 2238 रुपयांनी स्वस्त झालेय.
येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काही दिवसांत सोने प्रति दहा ग्रॅम 42500 रुपयांवर येऊ शकते. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये सुमारे 183 रुपयांची घसरण नोंदली गेली.
फक्त मार्च महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास सोन्याच्या किमतीत आतापर्यंत प्रति दहा ग्रॅम 2238 रुपयांची घट झाली. त्याचबरोबर जानेवारीपासून सोन्याच्या किमती जवळपास 5870 रुपयांनी खाली आल्यात. आता एप्रिल महिन्यापासून लग्नाचा सिझन सुरू होत आहे. अशा परिस्थितीत या मोसमात लग्न करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमती त्यांच्या अखेरच्या उच्चांकी पातळीवरून खाली आल्यात आणि ते 11922 रुपये आहेत.
केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या भावातील घसरणीत अनेक घटक समोर येत आहेत. अर्थसंकल्पात आयात शुल्कामध्ये 2.5 टक्के कपात जाहीर करण्यात आली. यामुळे सोने-चांदीच्या बाजारावर थेट परिणाम होत आहे. त्याच वेळी गेल्या काही दिवसांत गोल्ड ईटीएफकडून जोरदार नफा बुकिंग झालाय. त्याचा परिणाम दागिन्यांवरही दिसून येत आहे. केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात सोने देशांतर्गत बाजारात 42500 च्या पातळीवर येऊ शकते.