छठ पूजा, दिवाळीसाठी मुंबई-वाराणसी मार्गावर १२ विशेष रेल्वे गाड्या
मुंबई प्रतिनिधी छठ पूजा आणि दिवाळी सणानिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून, मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी या मार्गावर १२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते उत्तर भारत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष गाडी क्र. ०४२२५ ही १४ ऑक्टोबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर मंगळवारी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:०५ वाजता वाराणसीला पोहोचेल. तसेच, विशेष गाडी क्र. ०४२२६ ही १३ ऑक्टोबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर सोमवारी वाराणसी येथून पहाटे १:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापति (भोपाळ), बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना मोठा लाभ होईल.
या विशेष गाड्यांमध्ये ४ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि २ जनरेटर कार अशी डब्यांची रचना असेल. प्रवाशांच्या सोयी आणि आरामासाठी रेल्वेने विशेष नियोजन केले आहे.
गाडी क्र. ०४२२५ साठी आरक्षण १२ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. तिकिटे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध असतील. प्रवाशांनी वेळापत्रक आणि थांब्यांबाबत अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅप तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी करत प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

