धक्कादायक.. विहिरीत पडून ११ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क

लखनऊ : यूपीतील लखनऊमध्ये नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे एक दुर्दवी घटना घडली आहे. विवाह सोहळा असताना, याठिकाणी बुधवारी रात्री १२ पेक्षा अधिक महिला व मुली एका विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत ११ महिलांचा मृत्यू झाला आहे.तर २ जण गंभीर जखमी आहे.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. दरम्यान, या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

यूपीतील ही घटना कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न सोहळा होता. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांमुळे जास्त वजन पडल्यानं स्लॅब खाली कोसळला त्यामुळे सर्व महिला विहिरीत पडल्या. दरम्यान, वेळीच मदत मिळाली नसती तर, अधिक महिलांचा मृत्यू झाला असता अशी माहिती मिळाली आहे.

या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. तसेच काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. परंतु महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु ११ महिलांचा मृत्यू झाला तर २ जण अद्यापही गंभीर आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here