लोकशाही संपादकीय लेख
भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्यासह अकरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. त्यात माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे. म्हणजेच भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे ११ नगरसेवक निवडून आले होते, ते सर्व शिवसेनेत गेल्याने शरद पवार गटाला फार मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे गायत्री भंगाळे या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर जात पडताळणीवरून त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यामुळे जात प्रमाणपत्रासंदर्भात त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. या न्यायालयीन लढ्याचा निकाल येण्याआधीच गायत्री भंगाळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्या. हा एक प्रकार शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा मानला जात आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदारकीची निवडणूक लढवली होती. सुरुवातीला १०९ नगरसेवक माझ्या बैठकीला उपस्थित होते, असे सांगणारे अनिल चौधरी, “मला फार मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मी आमदारकीची निवडणूक जिंकणारच,” असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होते. भाजपची उमेदवारी नंदकिशोर महाजन यांना मिळाली तेव्हा अनिल चौधरी म्हणायचे, “नंदू महाजन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा काहीच अनुभव नाही. मी माजी नगराध्यक्ष आहे. मला नगरपरिषद प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवून निवडून येणारच.” अशी गर्जना अनिल चौधरी करायचे. “आता काहीही झाले तरी मी माघार घेणारच नाही. कितीही प्रकारचा दबाव आला तरी मी माघार घेणार नाही,” असे अनिल चौधरी सांगत होते. मात्र, निवडणुकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि “शिंदे साहेबांचा फोन आल्यामुळे मला माघार घेण्याशिवाय पर्याय नाही,” असे सांगून अनिल चौधरी यांनी निवडणुकीच्या आदल्या संध्याकाळी माघार घेतली आणि भाजपचे नंदू महाजन यांना आपला पाठिंबा जाहीर केला. तेव्हापासून असे कळून चुकले होते की, अनिल चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी फक्त काही दिवसांचा कालावधी जावा लागणार आहे. हे मात्र खरे आहे. त्यामुळे अनिल चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काही वाटत नाही. आज ना उद्या हे होणारच होते, असे वाटत होते. त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अपेक्षेप्रमाणे प्रवेश केला आहे. परंतु अनिल चौधरी यांचे मोठे बंधू, माजी आमदार संतोष चौधरी, मात्र अद्याप तरी शिवसेनेत गेलेले नाहीत.
संतोष चौधरी यांचे चिरंजीव सचिन चौधरी यांनी अकरा नगरसेवकांबरोबर शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हणजेच संतोष चौधरी हेसुद्धा आज ना उद्या शिवसेनेत प्रवेश करतील, एवढे मात्र निश्चित. कारण भुसावळमध्ये संतोष चौधरी हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या ऐवजी संतोष चौधरी नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळत होते. त्यामुळे पहिल्या सभेत २५१ विषय घेऊन जोरदार हंगामा केला होता. तसेच विविध विषयांवर पालिकेत ज्यांचे नगरसेवक जास्त आहेत, त्या भाजप नगरसेवकांना जेरीस आणण्याचा प्रकारसुद्धा गायत्री भंगाळे यांनी अनिल चौधरी यांच्या सांगण्याने केला होता. परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र फार टिकू शकले नाही. भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र चार महिन्यांनी रद्द झाले आणि त्यांचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद गेले. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नारखेडे आल्या. आता गायत्री भंगाळे न्यायालयीन लढा देत आहेत. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद सध्या रद्द झाले आहे. निकाल आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज ११ नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे हे शिवसेनेत गेल्याने शिवसेना हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. तेव्हा भाजपचे मंत्री संजय सावकारे यांचे चौधरी गटाशी कसे संबंध राहतील, हा एक चर्चेचा विषय आहे. अनिल चौधरी आणि संतोष चौधरी यांच्याशी मंत्री संजय सावकारे यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते राजकारणात आहे. ते आता शिवसेनेत आल्यामुळे भाजप कशा पद्धतीने वाटचाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता नाही म्हटले तरी महायुती म्हणून शिवसेना शिंदे गटाची ताकद भुसावळ नगरपालिकेत वाढली आहे. पाहूया, काय होते ते.
भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांना निवडून आणण्यासाठी भुसावळ शहरातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. लेवा पाटीदार समाजाची नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी संपूर्ण लेवा समाजाची फार मोठी मदत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची या निवडणुकीतील भूमिकाही फार महत्त्वाची होती. संजय सावकारे यांच्या पत्नी जयश्री सावकारे नको म्हणून निगेटिव्ह वोटिंग झाले होते. त्यात गायत्री भंगाळे यांचा नंबर लागला होता. आता अनिल चौधरी आणि त्यांचे बंधू संतोष चौधरी यांच्याशी पुढील काळात कशा पद्धतीने संबंध राहतील, हे दिसून येईल. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात आजचा शत्रू हा उद्याचा मित्र आणि आजचा मित्र हा उद्याचा शत्रू होऊ शकतो. त्यामुळे राजकारणात काय होईल, हे सांगता येत नाही. पुढची लढाई संजय सावकारे यांची चौधरी बंधूंबरोबर कशी राहील, हे पाहण्यासारखे राहील. संजय सावकारे एकेकाळी संतोष चौधरी यांचे सहाय्यक होते. आपल्याला मदत होईल म्हणून भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर संजय सावकारे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले. परंतु काही महिन्यांतच या दोघांमध्ये बिनसायला लागले. त्यामुळे संजय सावकारे आणि संतोष चौधरी यांच्यात टोकाची मतभिन्नता निर्माण झाली. ती अद्याप कायम आहे. दोघांच्या मधून विस्तवही जात नाही. विळ्या-भोपळ्याचे नाते आता निर्माण झाले आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

