ना ऑडिओ दाखविला ना व्हिडीओ, ना कुठल्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खामगांव- शेगांव रोडवरील धनकुबेर मंदिराच्या वर्धापन दिनी 1 मार्च रोजी संत सुश्री अलकाश्रीजी यांचा संगीत सुंदरकांड सत्संग कार्यक्रम रद्द झाल्यामुळे सुरेश नागेश्वर महाराज संतापले. याबाबत 2 मार्च रोजी सायंकाळी विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत सुश्री अलकाश्रीजी सोबत झालेल्या संवादाची ऑडिओ व्हिडीओ सादर करुन गौप्यस्फोट करणार असल्याचे प्रसार माध्यमातुन जाहीर केले होते.

परंतु पत्रकार परिषदेत नागेश्वर महाराज यांनी ऑडिओ-व्हिडीओ दाखविण्यास नकार देऊन पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे महाराजांची पत्रकार परिषद बारगळल्याचे दिसुन येत आहे.

धनकुबेर मंदीराचे अध्यक्ष सुरेश नागेश्वर महाराज यांनी वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आसन देणगी सोफा 1101 रु., खुर्ची 801 रु., गादी 601 रु., व मॅटीन 301 रु. आकारली होती.

कार्यक्रमाला केवळ देणगीदारांनाच प्रवेश होता. त्यामुळे सदर धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात नसल्याने अलकाश्रीजी यांनी कार्यक्रम घेण्यास नकार दिला.

तर यासाठी नागेश्वर महाराज यांनी गोपाल राठी, रमणसिंह मोहता व अनिल नावंदर यांना कारणीभूत ठरविले आणि त्यांच्याविरुध्द जातीयवाद व जीवे मारण्याची धमकी असे विविध आरोप करीत शेगांव ग्रामीण पोस्टेला 1 मार्च रोजी तक्रार दिली असल्याचे समजते.

तर 2 मार्च रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अलकाश्री व त्यांच्याशी संबंधीत व्यक्ती सोबत झालेले संवाद व तक्रारीत नमुद घटनेचे ऑडिओ-व्हिडीओ दाखविण्याचे प्रसार माध्यमातून जाहीर करुनही दाखिवले नाही.

उलट पत्रकारांनाच तुम्हाला का दाखवू असा प्रतिप्रश्न करुन टाळले. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही समर्पक व समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. यावरुन नागेश्वर महाराज यांची पत्रकार परिषद बारगळल्याचे दिसुन येते.

Leave A Reply

Your email address will not be published.