मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून अभिजात दर्जा मिळाला म्हणून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. त्याच मराठी विषयात दहावीत महाराष्ट्रातले तब्बल 38 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. ही गोष्ट आपल्यासाठी लाजिरवाणी आहे.
दहावीच्या निकालात राज्यात मराठी विषयात तब्बल 38 हजार 437 विद्यार्थी नापास झालेत. मुंबई विभागात तब्बल 4 हजार मुलं मराठीत नापास झाली आहेत तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये तब्बल 15 हजार 117 विद्यार्थी नापास झालेत. मराठी विषयात नापास होण्यामागे अनेक कारणं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितली आहेत. त्यामुळे ही स्थिती सुधारून निकाल चांगला यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयावर लक्ष द्यावं लागेल, असं लातूर मंडळाचे अध्यक्ष सांगत आहेत.
इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण जातंय, हे दुर्दैवी आहे. इंग्रजीपेक्षा मराठी अवघड, 38 हजार 437 विद्यार्थी नापास तर इंग्रजीत 6 हजार 738 विद्यार्थी नापास झाले आहेत. इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे. अनेक घरांमध्ये मराठीला दुय्यम मानतात, पालक मराठीत बोलत नाही परिणामी मराठी कठीण बनल्याचं भाषातज्ञ सांगतात. जागतिक भाषा इंग्रजी, पुढचं शिक्षणही इंग्रजीत मग मराठी शिकून फायदा तो काय, या विचारानं ही स्थिती असंही मत भाषातज्ञांकडून व्यक्त होत आहे.