मुंबई : आपण एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा प्लान करीत असाल, तर उशीर करू नका. देशातील एलईडी टिव्हीच्या किंमती 1 एप्रिल 2021 पासून वाढू शकतात, कारण गेल्या एका महिन्यात ओपन सेल पॅनेल्स जागतिक बाजारात 35 टक्क्यांनी महागल्या आहेत. म्हणजेच एप्रिलपासून टिव्हीच्या किंमतीत किमान दोन हजार ते तीन हजार रुपयांची वाढ होईल. ओपन-सेल पॅनेल हा टीव्ही निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कंपन्या ओपन सेल स्थितीत टेलिव्हिजन पॅनेल आयात करतात. पॅनासोनिक, हायर आणि थॉमसन या ब्रँडच्या अधिकाऱ्यांनी असे सूचित केले आहे की, ते एप्रिलपासून किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत, तर एलजीसारख्या काही कंपन्यांनी यापूर्वीच किंमती वाढवल्या आहेत.
5 ते 7 टक्के वाढ होण्याची शक्यता
पॅनासोनिक इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनिष शर्मा म्हणाले की, पॅनेलच्या किंमती सतत वाढत आहेत आणि म्हणूनच टीव्हीच्या किंमती वाढत आहेत. अशी शक्यता आहे की एप्रिलपर्यंत टीव्हीच्या किंमती आणखी वाढतील. या वाढीबाबत विचारले असता ते म्हणाले, सध्याचा ट्रेंड लक्षात घेता एप्रिलपर्यंत किंमतीत 5 ते 7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे हायर अप्लायन्स इंडियाचे चेअरमन एरिक ब्रॅग्न्झा म्हणाले की, किंमती वाढविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. ते म्हणाले, खुल्या विक्रीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जर हे असेच चालू राहिले तर आपल्याला सतत किंमती वाढवाव्या लागतील.
ओपन सेलच्या किमतीत तीन पट वाढ
फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसन आणि युएस-आधारीत ब्रॅंड कोडकचा ब्रँड परवानाधारक सुपर प्लॅस्ट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (एसपीपीएल) म्हणाला की, बाजारात ओपन सेलचा अभाव आहे आणि गेल्या आठ महिन्यांत किंमती जवळपास तीन पटींनी वाढली आहेत.
2 ते 3 हजार रुपयांनी वाढेल किंमत
मागील आठ महिन्यांपासून पॅनेलच्या दरात दरमहा वाढ झाली आहे. एलईडी टीव्ही पॅनेलमध्ये 350 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी आली आहे. जागतिक पॅनेल बाजार मंदावला आहे. असे असूनही, गेल्या 30 दिवसांत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले की, एप्रिलपासून टीव्हीच्या किंमतीत किमान दोन हजार ते तीन हजार रुपयांची वाढ होईल.
6 हजारापर्यंत होऊ शकते वाढ
डायवा आणि शिन्को ब्रँड्सच्या मालकीची कंपनी विडिओटेक्स इंटरनॅशनल म्हणाली की, ओपन सेलच्या किंमतीत इतकी वाढ या उद्योगाने कधी पाहिलेली नाही किंवा अपेक्षितही नाही. व्हिडीओटेक्स इंटरनॅशनल ग्रुपचे डायरेक्ट अर्जुन बजाज म्हणाले की, 32 इंचाच्या स्क्रीन साईज टीव्हीची भारतात सर्वाधिक विक्री होते, त्यामुळे 32 इंचाच्या स्क्रीन टीव्हीची किंमत 5 ते 6 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते.