हतनूर धरणातील गाळ काढणार केव्हा?

0

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी राज्य शासनाच्या बळीराजा संजिवनी योजनेंतर्गत 13 हजार 651.61 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी 620.58 कोटी तर चाळीसगाव तालुक्यातील वरखडे- लोंढे प्रकल्पासाठी 456 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हे दोन्ही प्रकल्प गेल्या 20 वर्षापासून रखडून पडलेले आहेत. जलसंपदा मंत्री जळगाव जिल्ह्याचे असतानासुद्धा या दोन्ही प्रकल्पांना गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये विशेषत: या दोन्ही प्रकल्पाचा लाभ ज्या गावांना मिळणार आहे. तेथील ग्रामस्थांचा तसेच शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. शेळगाव बॅरेज हे तापी नदीवरील हा प्रकल्प 1998 साली मंजुरी मिळाली. त्याच कालावधीत वरखेडे- लोंढे या सिंचन योजनेला मंजुरी मिळाली. गेल्या 20 वर्षात निधी नसल्याने हे प्रकल्प अपुर्णावस्थेत राहिले. शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले बांधकामाच्या साहित्याची चोरी झाली. प्रकल्पासाठी वापरलेल्या लोखंडी आसार्‍यासुद्धा कापून चोरुन नेल्या. गेल्या चार वर्षात शेळगाव असो अथवा वरखेडे- लोंढे सिंचन प्रकल्पावर एक विटेचेही बांधकाम झाले नाही. निधीचेच कारण पुढे केले जात होते. जळगाव जिल्ह्यातील या दोन प्रकल्पांसाठी बळीराजा संजिवनी योजनेंतर्गत निधी जाहीर झाला असला तरी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे मध्यम प्रकल्पासाठी मात्र निधी किती मंजूर झाला याचा मात्र उल्लेख नाही हे विशेष होय. तसेच 1982 साली बांधण्यात आलेल्या तापी नदीवरील हतनूर धरण जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. धरण 54 टक्के इतक्या गाळाने भरलेले आहे. चिखल गाळ साचल्यामुळे तो दगडासारखा घट्ट बसलेला आहे. त्याचा परिणाम पाणी जमिनीत झिरपत नसल्याने आजूबाजूच्या शेतीला त्याचा फायदा होत नाही. म्हणून हतनूर धरणाच्या साचलेला गाळ काढण्यासंदर्भात विचार झाला नाही तर भविष्यात चिंताजनक ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्प आणि वरखेडे- लोंढे प्रकल्पाला निधी उपलब्ध झाल्यामुळे त्या प्रकल्पाच्या कामाला गती येईल. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. परंतु पाडळसरे धरणाच्यासाठी निधीचा उल्लेख नाही त्याचे काय? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. कारण तोही प्रकल्प गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने झालेली आहेत. अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या भावना संतप्त आहेत. तापी नदीवरील हतनूर धरणाचे बांधकाम होऊन 36 वर्षे पुर्ण झाले आहेत. 388 दशलक्ष घनमिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सुमारे पावणेदोनशेहून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. 37 हजार 838 हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. म्हणून तापीवरील हतनूर धरण हे जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. गेल्या 36 वर्षांपासून या नदीपात्रात साचलेला चिकट गाळ काढणे प्रशासनासमोर एक आव्हानच म्हणता येईल. गाळ काढण्याआधी त्या चिकट गाळात ड्रिल मशिनद्वारे ड्रिलींग करुन पाणी जमिनीत जिरवण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. कारण तसे केल्याशिवाय जमिनीत ते पाणी झिरपणार नाही. त्यासाठी शासनाने विशेषत: जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या धरणात साचलेला 54 टक्के गाळ कसा काढता येईल यासाठी सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. गाळ काढले गेले तर धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढेल. अन्यथा ती क्षमतासुद्धा दिवसेंदिवस कमी होईल.
कारण मध्यप्रदेशात तापीच्या उगमापासून पाण्याबरोबर वहात येणारा गाळ पुन्हा धरणात साठणारच आहे. त्यामुळे हतनूर धरणातील गाळासंदर्भात गांभीर्याने घेऊन तो काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, हीच अपेक्षा!

Leave A Reply

Your email address will not be published.