सुरगाणा येथे दुचाकी अपघातात २ ठार, १ जखमी

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

घागबारी येथे रात्री १०.४५ वाजेच्या दरम्यान दि.१४ जानेवारी रोजी दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. यामध्ये राहुल गोपाळ चौधरी (वय. २३,रा. उबरपाडा, सुरगाणा), भोला हिरामण बागुल (वय २२, रा. साबरदरा ह.मु. सुरगाणा), पंकज जयराम पवार वय २१, रा. बोरपाडा कोटंबी ह.मु. सुरगाणा) अशी दुचाकीस्वारांची नावे असून ते तिघेही रात्री वणीकडून सुरगाणाकडे एम.एच.१५, एच.एन.२७११ या सुझुकी या दुचाकीवरून येत असतांना घागबारी फाट्याच्या पुढील फरशीवरील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने एका झाडावर आदळून दुचाकी पंचवीस ते तीस फुट खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले.

गाडीचा स्पीड १२७ वर लाॅक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घागबारी फाटा ते भितबारी खिराड फाटा हा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या टप्प्यात आज पावेतो चाळीस ते पंचेचाळीस जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिस पाटील गायकवाड यांनी सांगितले. या वळणावर अरुंद फरशी असल्याने दुसरे वाहन समोर आल्यावर चालकाचे लक्ष विचलित होऊन घाबरगुंडी उडते. तसेच या अंतरावर कोठे हि अपघात प्रवण क्षेत्र अथवा वळणावर दिशादर्शक फलक, बाण नाहीत.

यामध्येही राहुल गोपाळ चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेच्या मणक्यांमध्ये दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी पंचायत समितीचे सदस्य एन.डी.गावित यांनी नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर भोला हिरामण बागुल व पंकज जयराम पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागून इजा झाल्याने ते जागीच ठार झाले आहेत.

घागबारीचे पोलिस पाटील गोपाळ गायकवाड, माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक चिंतामण गायकवाड, पंडित तुंगार पोलिस पोलिस गोतुर्णे
यांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेतून वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पंकज व भोला यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. भोला हा ग्रामसेवक हिरामण बागुल यांचा एकुलता एक चिरंजीव होता. तर पंकज हा अनाथ मुलगा होता. त्याने परिस्थितीवर मात करीत इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात नाशिक येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा सांभाळ सुरगाणा गावाचे दिवंगत पोलिस पाटील रामभाऊ भोये यांनी केला होता. तदनंतर चंद्रकांत भोये हे सांभाळ करीत होते. नुकत्याच झालेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली होती. त्याचा निकाल येत्या १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर राहुल हा शिक्षक भास्कर चौधरी याचा सख्खा पुतण्या तर एन.डी.गावित यांचा भाचा आहे.

तिन्ही युवकांवर संक्रांत कोसळल्याने सुरगाणा शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस गोतुर्णे, गवळी, पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडके, पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.