साठवर्षाची काँग्रेस सत्ता खोटी होती, सहावर्षाची मोदी सत्ता शंभर टक्के खरी आहे?

0

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्या नेतृत्वाखाली एकतीस वर्षापूर्वी म्हणजेच २५ सप्टेबर १९९० रोजी गुजरातच्या सोमनाथ मंदिरातून एक रथ यात्रा निघाली होती. रथयात्रेचा मुख्य उद्देश्य विश्व हिंदू परिषद च्या राम मंदिर आंदोलनाला मोठया प्रमाणात पाठिबा मिळवून देणे. तेव्हा बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का!. ही विश्व हिंदू परिषदची घोषणा होती. त्यातुन बजरंग दल चा जन्म झाला. व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याचा आदेश काढला होता.त्याला रोखण्यासाठी सोमनाथ ते अयोध्या राम रथ यात्रा निघाली होती.लाखो कारसेवक यात्रेत सहभागी झाले होते, ज्या ज्या जिल्ह्यातून राज्यांतून राम रथ यात्रा गेली त्या त्या भागातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले, पांच राज्यातुन फिरून आलेली राम रथ यात्रा बिहारमध्ये मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रोखली. त्यात मंडल आयोग लागू करणाऱ्या व्ही पी सिंगांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कोसळले तेव्हा पासुन आर एस एस प्रणित सर्व पक्ष संघटना संस्थाच्या नांवाखाली साडेतीन टक्के ब्राम्हणांनी पंच्यांशी टक्के ओबीसी मागासवर्गीय, आदिवासी समाजाला हिंदू बनविण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला होता. ६ डिसेंबर १९९२ ला कार सेवकांनी बाबरी मस्जिद पाडली.ओबीसी, मागासवर्गीय आदिवासीनां हिंदू बनविणाऱ्या सर्व डरपोकानी हात वर केले, पण बांद्रा येथे बसलेल्या शिवसेना प्रमुखानी जबाबदारी घेतली माझ्या शिवसैनिकांनी ती पाडली त्यांचा मला गर्व आहे असे जाहीरपणे सांगितले.

भारतीय संविधान नुसार धर्मसत्ता यशस्वी होऊ शकत नाही.हे लक्षात आल्या नंतर सर्व ओबीसी,मागासवर्गीय आदिवासीनां हिंदू म्हणून एकत्र करून मोठा असंतोष निर्माण करणारी शक्ती तयार केल्या गेली,त्यामुळेच २०१४ आणि २०१९ ला पूर्णपणे धर्मसत्ते सोबत राजसत्ता हाती घेण्यास ते पूर्णशक्तीने सर्व यशस्वी झाले.

महाभारत आणि रामायण हे भारतातील हिंदू समाजाचे आदर्श धर्म ग्रंथ समजले जातात. रामाने चौदा वर्ष वनवास भोगला हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर राम राज्य आले. त्याच राम राज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने २०२० ला नवीन रामराज्याची सुरवात केली.इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.विचाराने लढाई लढली तर इतिहास निर्माण करता येतो.अविचाराने लढाई केली तर युद्ध होते.आणि युद्धात काय होते.ते ऐतिहासिक इतिहास वाचा.

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. या युध्दामध्ये कौरवांच्या बाजूने व पांडवांच्या बाजूने जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी कधीच झाली नव्हती. युद्ध संपल्यानंतर याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसायला लागली होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवाच विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. एखाद दुसरा पुरुष फक्त दिसत होता.

महाराणी द्रौपदी हस्तिनापुरातील महालात दु:खद अंत:करणात निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आला. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती त्याला म्हणाली, “भ्रातश्री, असा तर मी कधी विचारच नव्हता केला. हे असं कसं झालं?

कृष्ण म्हणाला, “पांचाली, नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता नां? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता. “द्रौपदी म्हणाली,कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस?”

योगेश्वर कृष्ण म्हणतात, ”नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती फळे समोर येतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही.”

द्रौपदी विचारते, “कृष्णा, मग ह्या युध्दाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. असं तुला म्हणायचं आहे कां?”  कृष्ण म्हणतात, “नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!”  द्रौपदी विचारते, “कृष्णा, मी काय करू शकत होते?” कृष्ण म्हणतो, “तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती. हे भगवान श्रीकृष्णाची गीता काय काय सांगते.धर्म,अधर्म,नीती,अनीती आपल्या फायद्यासाठी काही करा आणि त्याला धर्माची जोड लावा.सर्व माफ आहे.आज भारतातील सर्व जाती धर्माचे व हिंदू समाजाचे लोक कॉग्रेस साठ वर्ष किती वाईट होती यांचा अनुभव आता घेत असेलच.

आपले शब्दच आपल कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला देशाला भोगावे लागतात.जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जीभेत वीष आहे. (ही एक बोधकथा आहे.यातून आपण काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.) २०१४ पूर्वी आंदोलन देशभक्ती दाखविणारे होते,तर आताचे शेतकरी आंदोलना सह सर्व आंदोलन करणारे आंदोलनजीवी झाले आहे.

म्हणून शब्द जपून वापरा.सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे युद्ध चालू आहे. आपात्कालीन व्यवस्थापन चालू आहे. आपल्या लेखनीतून,वाणीतून,जीभेतून निघालेले शब्द आपल्याला संकटात टाकू शकतात. अनेक अडचणी निर्माण करू शकतात. अनेक वर्षांचे संबंध, नाते, मैत्री तोडू शकतात. बोलताना विचार करा. समोरची व्यक्ती दुखावणार नाही याचाही विचार करा. दुसऱ्याला बोलताना आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय केले असते याचाही विचार करा. कधी चुकून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडलाच तर, तात्काळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागा, समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग,किल्मिषे दूर करा तरच मैत्री, नाते संबंध टिकू शकतात.त्यासाठी सहा डिसेंबर १९९० नंतर देशातील मानवा मानवातील प्रेम वैचारिक मानसिकता बांधिलकी जवळ जवळ संपल्यात जमा झाली आहे.देश कोणत्या दिशेने जात आहे.त्यावर गांभियाने विचार करण्याची कुणाला गरज वाटली नाही.तीन टक्क्यावाला अल्पसंख्याक समाज आज पंच्याशी टक्के मागासवर्गीय समाजाचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करीत आहे. माणसात कसा बदल घडतो त्याची २०१४ च्या नंतरची प्रतिकीर्या वाचा.

२०१३ ला पेट्रोलच्या भाववाढीला वैतागलेले एक पुणेकर जोशी काका स्कूटर ढकलत ढकलत पंपावर जातात. तेथे पंपावरचा कर्मचारी त्यांना किती पेट्रोल भरायच विचारतो तेव्हा वैतागलेले जोशीकाका खास पुणेरी शैलीत “पाच रुपयाचं शिंपड! शिंचा स्कूटरवर म्हणजे पेटवून देतो!” म्हणतात. त्यावेळी हे जोशीकाका प्रत्येक सोशल मिडीयाच्या गृपमधे स्कूटर ढकलत होते. २०१४ ला देशात सत्तांतर झाले आणि जोशी काकांच्या आवडत्या पक्षाचे सरकार देशात स्थापन झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या पण देशात पेट्रोल डिझेलचा भाव सतत चढेच राहिले. भाववाढीने नवनवीन उच्चांक गाठले, पण जोशी काका आता स्कूटर ढकलत कुठल्याच गृपमधे फिरत नाहीत. आता जर कोणी जोशी काकांना विचारलं की, काका पेट्रोलचे भाव खूप वाढलेत हो; तर काका जाम भडकतात “लेको हो तुम्हाला सगळं फुकट पाहिजे. ७० वर्षात तुम्हाला फक्त फुकटाची सवय लावून पंगू केलय. तुम्हाला विकास पाहिजे पण कर भरायला नको. आयतखाऊ कुठले! फक्त पेट्रोल डिझेल भाववाढीवरच नाहीतर सर्वच समस्यांवर आता जोशी काकांनी आता सॉलीड यु टर्न घेतला आहे.

भारतातील विरोधी पक्षनेते पूर्वी कांदा महाग झाला, गँसचे भाववाढ झाले की, त्वेषाने रस्त्यावर उतरून सरकारचा राजीनामा मागणारे होते,जोशी काका आता भाववाढीचा निषेध करणाऱ्यांना “आयतखाऊ, फुकटे” अशी ठेवणीतली शेलकी विशेषण देतात. एवढेच नाहीतर पूर्वी शेतीशी काहीही संबंध नसणारे जोशी काका,देशपांडे,रानडे,लियमे,कुलकर्णी,बर्वे फडणवीस सारखे उच्चशिक्षित उच्च वर्णीय वर्गीय सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून आंदोलनात भाग घेत होते. पण जेव्हा जोशी काका,देशपांडे,रानडे,लियमे,कुलकर्णी,बर्वे फडणवीस उच्चशिक्षित,उच्च वर्णीय,वर्गीय लाडक्याचा नेता मुख्यमंत्री झाला तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी मोर्चे काढले तेव्हा ह्याच सर्वांचा संताप अनावर झाला आणि ते शेतकऱ्यांना “चोर, फुकटे, कर्जबुडवे, साले कर भरणा-यांच्या पैशावर मजा मारणारे” अशी विशेषणे देऊन मोकळे झाले.पहिला शब्दात ताकद होती.आताच्या शब्दात प्रचंड विष आहे.

एवढेच नाहीतर तेव्हा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत तेव्हा ही चांडाळ चौकडी या आत्महत्या नसून सरकारने केलेले खून आहेत.पाप लागेल, पाप म्हणून ओरडायचे. आता जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय निघाला तर जोशीसह सर्व जातभाई पत्रकार,संपादक ऊसळून उठतात. देशातला शेतकरी आळशी झालेला आहे, शेती नीट करायला नको, एपत नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नाकार्यात खर्च करतात, व्यसने करतात, दारु पितात आणि मग पळपुट्यासारखी आत्महत्या करतो. असा आरोप करतात.

जोशी काका, देशपांडे,रानडे,लियमे,कुलकर्णी,बर्वे फडणवीस उच्चशिक्षित,उच्च वर्णीय,वर्गीय लाडक्याचा आवडता पक्ष सत्तेवर आल्यानंतर देशाची खूप भरभराट झाली असे काही नाही. उलटपक्षी आत्मघातकी एककल्ली निर्णयांमुळे आर्थिक पाया खिळखिळा झाला. औद्योगिक क्षेत्र अडचणीत आले, रोजगाराची समस्या उग्र झाली. ही मान्यताप्राप्त विद्वान मंडळी ते मान्य करीत नाहीत. कारण त्यांच्याकडे तेवढा प्रामाणिकपणा नाही.

पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की ही मान्यताप्राप्त विद्वान मंडळी बच्चनच्या स्टाईलमधे “रुपया उसी देश का गिरता है जिसका प्रधानमंत्री गिरा होता है।” असे डॉयलॉग मारायचे. आता ते रुपया घसरण्याचा संबंध जागतिक बाजारपेठेशी जोडतात. पूर्वी सरकारने एखाद्या क्षेत्राचे खाजगीकरण करायचा निर्णय घेतल्यास ही मान्यताप्राप्त विद्वान मंडळी त्या क्षेत्रातील कामगारांच्या भवितव्यासाठी जीव तोडून आंदोलन करायचे,चर्चा सत्र,पत्रकार परिषदा,फुल पेज लेख लिहत होते. हे सरकार देश विकणार म्हणून बोंब मारायचे, ही मान्यताप्राप्त विद्वान मंडळीचा लाडका नेता पंतप्रधान झाल्यानंतर त्याने सरकारी कंपन्या विकायचा सपाटा चालू केला. तेव्हा ही चांडाळ चौकडी म्हणाले बरोबरच आहे, सरकारी पैशाचा चुराडा होतोय नुसता, फक्त खुर्च्या गरम करून वेतन आयोग पाहिजेत शिंच्यांना, कामे तर कवडीची करीत नाहीत, खाजगी मालकाच्या ताब्यात गेल्याशिवाय वठणीवर येणार नाहीत लेकाचे.

सरकार बदलले तेव्हा देशासमोर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन प्रमुख समस्या होत्या त्या आता अधिकच भीषण झाल्या. मान्यताप्राप्त विद्वान मंडळीचा नेता सगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला, पण वादविवाद सुरू झाला की,ही चांडाळ चौकडी या मुद्द्यांवर बोलतच नाहीत. ते राममंदिर ३७० कलम,पाकिस्तान,सर्जिकल स्ट्राईक यावर भर देतात. वाद घालणारा सामान्य बुद्धीचा असेल तर त्याला गार करून टाकतात, आणि तो वरचढ असेल तर सात्विक संतापाने त्याला देशद्रोही ठरवून तुमच्या सारख्या गद्दारांशी काय बोलायचे म्हणून काढता पाय घेतात.

मित्रांनो, असे असंख्य मान्यताप्राप्त विद्वान मंडळाची चांडाळ चौकडी तुमच्या आमच्या भोवती वावरत असते, ती देशाची आर्थिक परिस्थिती, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर स्वतःचे पूर्वीचे मत बदलून आजची परिस्थिती वर ठाम मत माडतात. या सगळ्यांचे पूर्वी मत होते की सर्व सरकारने केले पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे. आता ते बोलतात जनतेची काही जबाबदारी आहे की नाही?.

तुम्ही त्यांना परराष्ट्र धोरण, शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध महागाई बेरोजगारी कशाबद्दलही विचारा. ते उत्तर देणारच नाहीत. कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारले की, ते राहूल गांधी कसा पप्पू आहे, सोनिया गांधींचे लग्नाआधी नाव काय होते, आणि त्या काय काम करीत होत्या, फिरोज गांधी हा फिरोज खान कसा होता, जवाहरलाल नेहरू कसे अय्याश होते हे सगळे सांगत बसतात; ज्याचा खरे तर आजच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. पण काहीही झाले की नेहरूने वाटोळे करून ठेवले हो, ही एकच पळवाट मान्यताप्राप्त विद्वान मंडळीच्या चांडाळ चौकडीकडे असते. राम राज्यात असेच महाभारत घडत असते. श्रीकृष्णाची गीता आणि मोहन भागवत यांची गीता सोयीनुसार धर्म आणि अधर्माची व्याख्या करते,व त्यावर व्याख्यान देते.माणूस केंद्रित राजकारण करावे की धर्म केंद्रित भांडवलशाहीचे समर्थन करावे.हा सर्व सामान्य माणसाला मोठा प्रश्न पडला,काँग्रेसने साठ वर्ष देशाची अर्थव्यवस्था मोडून काढण्यासाठी कंपन्या काढल्या आणि मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देशातील उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या कंपन्या खासगी भांडवादाराला बिनधास्तपणे विकत आहेत.म्हणून म्हणावे लागते राम नाम सत्य आहे बाकी सर्व झूट आहे.साठवर्षाची कॉंग्रेस सत्ता खोटी होती.तर सहा वर्षाची मोदीची सत्ता शंभर टक्के सत्य आहे. त्याचे छायाचित्र या लेख सोबत देत आहे.हजार शब्दाचा लेख वाचण्या पेक्षा एक छायाचित्र पाहिल्यास सत्य परिस्थिती समजू शकता.

सागर रामभाऊ तायडे
मो.  9920403859,
भांडुप मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,
सलंग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

 

Leave A Reply

Your email address will not be published.