शेंदूर्णी नगरपंचायतीसाठी 74.19 तर धुळ्यात मनपासाठी 58 टक्के मतदान

0

पैसे वाटपावरून दोन्ही ठिकाणी आरोप/प्रत्यारोप : दोन जणांवर चाकूहल्ला

जळगांव, दि,9-
जळगांव महानगरपालिकेत सरळसरळ भाजपाने 87 पैकी 57 जागांवर बहुमत मिळवल्याने शतप्रतिशत भाजपा रूजविण्यात ना. महाजनांचा पॅटर्न कामी आला. नव्यानेच जाहीर झालेल्या शेंदूर्णी नगरपंचायतीत आज मतदारांचा उत्साह दिसून आला. यात 74.19 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. तर बहुचर्चित धुळे मनपात केवळ 58 टक्केच मतदान झाले असल्याचे मतदारांच्या आकडेवारीवरून दिसून येते.
जळगांव महापालिकेत 50 प्लसचे मिशन राबवणारच असा चंग भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी बांधला होता. व ते या निश्चयाने 57 जागांवर घवघवीत यश मिळवून महानगर पालिकेत एकहाती सत्ता मिळवली. तोच पॅटर्न शेंदुर्णी नगरपंचायतीसह धुळे मनपात राबवून शतप्रतिशत भाजपाची मोहिम ना.महाजनांच्या नेतृत्वाखाली राबविण्याची मोहिम आखली होती. परंतु शेंदुर्णी येथे रा.कॉ.चे स्थानिक माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांनी तर धुळे मनपात आ.गोटेंनी या मोहिमेस बंड पुकारून आव्हान दिले होते.
रविवार 9 रोजी शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी दुपारी 1.00वाजेपर्यत 51.40 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क नोंदविला होता. शेतात कामावर गेलेले शेतमजूर महिलावर्ग हे तीन वाजल्यानंतर नेहमीप्रमाणेच मतदान करण्यासाठी उत्साहाने आल्याचे दिसून आले यात सायंकाळ 4 वाजेपर्यंत शहरातील 9 मतदान केंद्र्ांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक मतदार बाहेरगावी रहिवासी असल्याने दुपार नंतर गर्दी वाढली होती.
शेंदुर्णीत शनिवार 8 रोजी झालेल्या दगड फेकीच्या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता असली तरी बहुतेक नागरीकांनी दुपार नंतरच मतदानास बाहेर पडणे पसंत केले. तर धुळे मनपात तीन वाजेपर्यत केवळ 40 टक्के मतदान झाले होते. तर मनपा निवडणूकीत पैसे वाटत असल्याच्या कारणावरून आ. गोटे, व धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले होते. धुळे शहरात 13 इतर मतदारांपैकी 8 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. धुळ्यात पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. हल्ल्याप्रकरणी लोकसंग्रामच्या चार जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला. याशिवाय अन्य घटनेत एकास 49 हजार रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मतदार यादी सापडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.