‘शिवा’ बैलचा वाढदिवस साजरा; शेतकऱ्याचा असाही आदर्श

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“बर्थ डे आहे भावाचा, जल्लोष सा-या गावाचा” एरव्ही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियावर तरुणाईचा जल्लोष अशा गाण्यातुन ओसंडुन वाहत असतो. पण चक्क खांद्याला खांदा लावुन शेतात राबणा-या व पाचशेवर शामीगोंडा शर्यतीत विजयी पताका फडकवीत मानाचा शामीगोंडा पटकावीत अंजिक्य ठरलेल्या  जिवाभावाच्या मैतर असलेल्या शिवा बैलाचा दहावा वाढदिवस मालक गोपाल सुरतसिंग परदेशी रा. वाडे. ता. भडगाव जि. जळगाव यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.

मुक्या जितराबाप्रती असलेला आदरभाव, प्रेम व्यक्त करणारा हा वाढदिवस सोहळा परिसरात आगळावेगळा ठरला आहे. वाडे येथील गोपाल परदेशी या शेतकऱ्याचा असाही आदर्श दिसुन आला आहे.

शेती कामात शेतकऱ्याला मदत करणारा शेतात राब राबणारा, शेतकऱ्याचा जिवाभावाचा मैञ म्हणजे बैल. बैलपोळयाला बैलांना सजवुन पुरणपोळीचा गोड घास बैल मैतराला घातला जातो. घरोघरी औक्षणही केले जाते. कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपण माणसांचे वाढदिवसाचे कार्यक्रम नेहमी पाहतो. माञ भडगाव तालुक्यातील वाडे येथील आदर्श शेतकरी गोपाल सुरतसिंग परदेशी यांनी आपल्या जिवाभावाचा सोबती  शिवा बैल मैतराचा वाढदिवस मोठया धुमधडाक्यात वाजत गाजत साजरा केला.

शामीगोंडा  बिनजोड शर्यतीत नावाजलेला हिंदकेसरी शिवा हा महाराष्ट्रात प्रख्यात झाला आहे.  वाडे शिवारातील गोंडगाव रस्त्यालगत शेतात विविधरंगी फुगे, डिजीटल बँनर आदींनी सजविलेल्या मंडपात हा कार्यक्रम दि. ७ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी डिजेच्या तालावर तेरे मनमे शिवा मेरे मनमे शिवा, ढवळा बैल मन्हा नंदीना राजा यासह विविध गाण्यांवर डिजेच्या संगिताच्या तालावर तरुणांनी नाचत वाजत गाजत आनंद साजरा केला.

यावेळी शेतकरी कुटुंबामार्फत या शिवाचे औक्षण करुन  केक कापण्याचा कार्यक्रम करुन शिवा बैल मैञालाही केक खाऊ घालीत हॅपी बर्थ डे शिवा अशा वाढदिवसानिमित्त उपस्थित शेतकऱ्यांनी, तरुणांनी शिवा मैञराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवनंतर शिवा सोबत तरुणांनी फोटोशूटही केले. फटाक्यांच्या आतषबाजीने वाढदिवस साजरा झाला. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त खमंग जेवणाची मेजवानीही ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमास या शेतकरी कुटुंबातील सुरतसिंग सरदारसिंग परदेशी, गोपाल सुरतसिंग परदेशी, अनिल सुरतसिंग परदेशी, भडगाव पंचायत समितिचे माजी उपसभापती राजेंद्र परदेशी, वाडे येथील माजी सरपंच भारत मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य भावसिंग गोमलाडु, वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, रोजगार सेवक नामदेव माळी, सरदार गोसावी, टेकवाडे येथील भिमसिंग परदेशी, सचिन पाटील, गोंडगावचे शिवाजी पाटील, हरीष पाटील, अमरसिंग गोमलाडु, बांबरुड प्र. ब. चे भोला परदेशी, वाडे येथील बालु माळी, सुभाष पाटील, जगदीश गोमलाडु, राजु गोमलाडु, निलेश बैरागी, बापु बैरागी यांचेसह शेतकरी, नागरीक मोठया संख्येने हजर होते.

मंडपात शिवाचा वाढदिवसाच्या शुभेच्छाचा डिजीटल फलक शिवा गृप वाडे, जय शंभु महाकाल गृप कजगाव या नावाने झळकत होता. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नागद, चाळीसगाव, खडकी, कासोदा, आडगाव, बहाळ, टेकवाडे, वाडे, गोंडगाव, बांबरुड प्र ब, सावदे, घुसर्डी, कजगाव, वडजी, आमडदे यासह अनेक गावातुन शेतकरी, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

वाडे येथे झालेल्या या आगळया वेगळया शिवा मैञ बैलाचा वाढदिवसाची चर्चा सर्वञ होतांना दिसत आहे. या वाढदिवसाचे आयोजन गोपाल सुरतसिंग परदेशी या शेतकरी कुटुंबाने प्रथमच केले होते. हा शिवाचा दहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. गोपाल परदेशी, निलेश बैरागी यांचेसह मिञ परीवार, शेतकरी आदिंनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परीश्रम घेतले.

निलेश बाबुलाल बैरागी व गोपाल परदेशी यांनी शिवा या बैल मैतराला शर्यतीसह इतर वेळाही चालवुन परीश्रम घेतलेले आहेत. शिवाचे बालपणापासुन गोपाल परदेशी या शेतकऱ्याने  लळा लावला.   गोपाल परदेशी यांनी १० वर्षापुर्वी तरवाडे ता. चाळीसगाव येथुन ७ डिसेंबरला हा लहानपणी गोर्हा विकत घेतला होता. या गोर्हाचे नाव या शेतकऱ्याने शिवा असे ठेवले. शिवाला लहानपणापासुन शर्यतीचे धडे देणाऱ्या गोपाल परदेशी यांना या शिवा बैलाचा लळाच लागला. शिवा नाव पुकारताच हा शिवा बैल गोपालजवळ येउन उभा राहतो. शिवा सार्या परीवाराचा लाडका ठरला आहे.

बिनजोड शर्यतीत शिवा नावाजलेला खान्देश हिंद केसरी 

गोपाल परदेशी या शेतकऱ्याने या शिवा बैलाला पौष्टीक आहार देत धडधाकड बनविले. शर्यतीचे रोज धडे देत शिवा हा बिनजोड शर्यतीत महाराष्ट्रात जणू हिंद केसरीच ठरला आहे. शामीगोंडा शर्यतीत हा शिवा ५०० च्या जवळपास बिनजोड शर्यतीत मिरवुन आला आहे. मुंबई, कर्जत, पुणे, नाशिक, जळगाव जिल्हयातही हा शिवा शर्यतीत नावाजलेला ठरला आहे. या शिवाला आजपर्यत बिन जोड शर्यतीत जोडच लागली नाही. नेहमी विजयाच्या पताका लावणारा हा हिंदकेसरी शिवा बैल मिञ महाराष्टाृत प्रख्यात झालेला आहे.

या शेतकऱ्याकडे  ११० जनावरे

वाडे येथील सुरतसिंग सरदारसिंग परदेशी हे मोठे बागायतदार शेतकरी कुटुंब आहे. यांच्याकडे ४ बैलजोडया, गायी, म्हशी अशी एकुण ११० जनावरे आहेत. शेतीव्यवसायासोबतच पशुपालन ते करतात. दुग्धव्यवसाय व जनावरांपासुन शेतीसाठी शेणखतही मिळते. गोपाल परदेशी हे सुरतसिंग परदेशी यांचे सुपुञ आहेत. गोपाल परदेशी या शेतकर्याने जनावरांना लळा लावला आहे. माञ गोपाल परदेशी यांना शामीगोंडा शर्यतीत सहभाग घेणे लहानपणापासुनच मोठी आवड आहे. त्यातीलच हा शिवा बैल बिनजोडी शर्यतीत हिंदकेसरी ठरला आहे. महाराष्टाृत नावाजलेला हा शिवा आहे. शिवामुळे महाराष्ट्रात आपला नावलौकीक झाल्याने व जिवाभावाचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे या शिवाचा वाढदिवस कुटुंबामार्फत करावा. असे सुचल्याने आपण शिवा याचा वाढदिवस साजरा केल्याचे वाडे येथील शेतकरी गोपाल सुरतसिंग परदेशी यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना सांगीतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.