शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉस मराठी हा शो जवळपास दोन वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये कलाकरांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात पाहून नेटकऱ्यांनी टीका केली. पण प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाची जाहिर माफी मागितली आहे.

शिवलीला यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. त्यांनी वारकरी संप्रदायाची या मुलाखतीमध्ये जाहिर माफी मागितली आहे. बिग बॉसच्या घरात मी गेल्यामुळे ज्येष्ठ मंडळी आणि वारकरी संप्रदाय नाराज झाल्यामुळे मी मस्तक टेकवून त्यांची माफी मागते. प्रेक्षकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्याचा माझा मार्ग चुकीचा असला, तरी माझा हेतू प्रामाणिक होता. प्रेक्षकांचे महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याविषयी प्रबोधन करावे याच हेतूने बिग बॉसच्या घरात मी गेले होते.

पण मी बिग बॉसच्या घरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी गेल्याचे आरोप करण्यात आले. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता. मी एका गाण्यावर नाचले म्हणून माझ्यावर टीका करण्यात आली. पण ज्या गाण्यावर मी नाचले त्यातील एक गाणे विठुरायाच्या वारीचे होते तर दुसरे गाणे आई तुळजा भवानीचे होते. इतर कोणत्याही हिंदी गाण्यावर माझे हात किंवा पाय हालले नसल्याचे शिवलीला म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, वारकरी संप्रदायाबद्दल ज्या प्रेक्षकांना माहिती नाही, अशा प्रेक्षकांना मी बिग बॉसच्या माध्यमातून माहिती करुन देण्याचा प्रयत्न केला. घरातील इतर स्पर्धकही माझ्यामुळे तुळशी वृंदावनाच्या रोज पाय पडू लागले. तसेच बोला पुंडलिक वरदाचा नाद घरात घुमू लागला हेच माझे यश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.