शिक्षण…का? कशासाठी ?

0

मित्रानो, शिक्षण आणि राजकारण हि दोन अशी क्षेत्रे आहेत कि ज्याबाबत कोणीही आणि काहीही बोलू शकतो, त्यासाठी त्याला अभ्यासाची गरज वाटत नाही कारण आपण त्यातील तज्ज्ञ आहोत आणि आपल्याला त्यातील सर्व कळतं असं प्रत्येकाला वाटत असतं. गेली १२ वर्षे शिक्षण क्षेत्रातच काम करीत असल्याने मला वरील दोन प्रश्न नेहमी पडतात. हे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे शिक्षण घेणारे, शिक्षण घेतलेले व शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण असलेले नागरिक आपल्या आजूबाजूला पाहिल्यानंतर असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, ते करीत असलेली कृती या सगळ्यांचा अर्थ शिक्षित माणसाकडून अपेक्षिल्याप्रमाणे नसतो. यासाठीच आपण आशा फौंडेशनच्या यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “मी मोठं होणार !” अशी घेतली आहे. व्यक्तीने केवळ वयाने मोठे होऊन चालणार नाही तर त्याने वैचारिकदृष्ट्या समंजस, परिपक्व असण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण व्यतिरिक्त आर्थिक, वैचारिक, शारीरिक व सामाजिक भान यांचा समावेश असणे आवश्यक आहे. अभ्यासाला व्यायामाची व अध्यात्मिकतेची जोड मिळाल्यास मन शांत होऊन येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास खंबीर बनते.

शिक्षित माणसं असं का वागतात ? हा प्रश्न मला शिक्षण का व कशासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त करतात. चांगली नोकरी मिळणे एव्हढेच मर्यादित ध्येय सध्याच्या समाज व्यवस्थेला वाटते आणि म्हणूनच ते शिक्षणाकडे त्यादृष्टीने पाहतात आणि अंगिकारही करतात. येथे ज्ञान आणि शहाणपण यापेक्षाही मार्कांना अधिक महत्व असते. आपले स्वतःचे भले व्हावे यासाठी कोणालाही अगदी निसर्गालाही दावणीस बांधण्याकरिता आजचा समाज तयार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. निसर्गानुकूल पर्यावरणीय जीवनशैलीचा अंगीकार हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असावे त्यासाठी आवश्यक असलेला संस्कार, ज्ञान, जीवनशैली व व्यक्तिमत्व विकसित करणं अगत्याचे ठरते.

आशा फौंडेशन ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता विकसित करुन त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी कशा मिळतील यासाठी कार्यरत आहे. या कामाचे मूळ शिक्षणाद्वारे विद्यार्थ्याला रोजगार मिळत नाही यात आहे. पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुनही विद्यार्थी रोजगारक्षम होत नाही याची जबाबदारी कोणाची ? मध्यंतरी पुण्यात फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी चैन करण्यासाठी वाटमारीचा मार्ग निवडल्याचे वाचले, त्यांना अटक केल्यानंतर याबाबतची कबुली त्यांनी दिली. चोरी, वरकमाई, व्यसनाधीनता यासारख्या गोष्टींना आज समाजाने स्वीकारलेले दिसते. अशांना दुर्दैवाने अधिक प्रतिष्ठाही दिलेली दिसते. या परिस्थितीचा अभ्यास करतांना शिक्षणामुळे सुसंस्कृतपणा, दूरदर्शीपणा किंवा शहाणपणा येतोच असे नाही, याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेत आहोत आणि प्रश्न पडतो, “शिक्षण का ? कशासाठी ?”

आतापर्यंतचा लेखनाचा बाज जरी नकारात्मक वाटत असला तरी ते भयंकर वास्तव आहे. आपण वेळीच त्यावर उपाययोजना करु शकलो नाही तर आपले भविष्य, आरोग्य, समृद्धी हे सर्वच धोक्यात आहे. कारण मुळात निसर्ग, त्याची व्यवस्था, त्याचे सौंदर्य, त्यातील वैविध्य आणि स्थैर्य हे सर्वच धोक्यात आले आहे. या परिस्थितीस अज्ञानी माणसे नव्हे तर सर्वच क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित, शिक्षित, भौतिकतेच्या आहारी गेलेले

व तंत्रज्ञाचा अतिरेकी वापर करणारे लोक अधिक कारणीभूत आहे. आपणास या सर्व गोष्टींच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव असली पाहिजे, आपण त्याला उत्तर शोधणारे ठरले पाहिजे.

हि परिस्थिती बदलावी यासाठी सर्वांनाच प्रचंड मेहनत करावी लागेल, विशेषतः माणसाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल. निसर्गानुकूल जीवनशैली अंगिकारणाऱ्यांना समाजासमोर आणले पाहिजे, त्यांना सन्मानित केले पाहिजे. त्यांनी निवडलेला मार्ग आणि त्याचा वैयक्तिक जीवनात झालेला लाभ इतरांना सांगावा लागेल.

शिक्षक व पालक, दोघांनाही मुलांच्या मानसिकतेची जाणीव हवी. यासाठी शिक्षणाकडे बघण्याचा दोघांनी एक व्यापक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. विद्यार्थ्यांचे पूर्वग्रह, त्याच्या आवडीनिवडी, भीती आणि स्वतःच्या क्षमतांबद्दल असलेली शंका हि शिक्षण व्यवस्थेतील अडसर आहेत. शाळा, महाविद्यालयात मुलांनी का जावे ? या प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही आणि सर्व जातात म्हणून आपल्या मुलाने जावे म्हणून हा शिक्षण व्यवस्थेचा गाडा चालतांना आपल्याला दिसतो. का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कोणाचीही तयारी नसल्याने विद्यार्थ्यांचे अपेक्षित असलेले व्यक्तिमत्व घडत नाही. मुलाला स्वतःची ओळख व्हावी, त्याच्यामध्ये असलेले गुण, त्याच्या मर्यादा याची जाणीव त्याला व्हावी. त्याच्या क्षमतांवर आधारित कौशल्ये विकसित करण्यासाठी महाविद्यालयात गेले पाहिजे, म्हणजे तो रोजगारक्षम होण्याची शक्यता अधिक वाढेल. हि गोष्ट समजून न घेता व्यवस्थेतील सर्वचजण आपली जबाबदारी ढकलत इतरांना दोष देण्यात धन्यता मानतो.

जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमधील सौहार्द वाढेल, त्यातील परस्परपूरकता वाढविण्याचे काम शिक्षणाने केले पाहिजे. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय त्याप्रमाणे शिक्षणाचं स्वरुप व व्यवस्था बदलतेय का ? व्यापक दृष्टी, सर्वसमावेशक बुद्धी, सूक्ष्म निरीक्षण, अवलोकन, समस्येचे निदान करुन त्यावर उत्तर शोधणारा तसेच चांगला नागरिक बनण्याची महत्वाकांक्षा असलेला विद्यार्थी कुठे आहे ? असा प्रश्न दुर्दैवाने विचाराचा लागतो. आम्हास तीच मुले दिसतात, त्यांचे प्रमाण अत्यल्प असूनही आम्हाला आशा आहे. शिक्षणाने माणसाला व्यक्तिमत्व मिळावे, त्याचं विचारविश्व व्यापक व्हावं, माणुसकी शिकवावी, जगण्याशी इमान राखण्याची प्रेरणा मिळावी. त्याच्यात संविधान, लोकशाही, समाज, कार्य यांचे प्रति निष्ठा निर्माण व्हावी. त्याला जीवन शिक्षण मिळावं, प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी.

शिक्षणाने मानवाला जगण्याची उभारी दिली पाहिजे. त्याच्यात कृतिशीलता निर्माण झाली पाहिजे. समाजाकडे पाहण्याची डोळसदृष्टी हवी, उद्यमशीलता वाढीस लागावी, जीवननिष्ठा बळकट व्हावी. आज पन्नाशीच्या दरम्यान असलेल्या माणसांकडे पहिले कि लक्षात येते कि, हे सुशिक्षित आहेत, सुरक्षित आहेत मात्र संकुचितही आहेत. ती आत्मकेंद्रित अधिक झाली, आपल्या कुटुंबपलीकडचा विचार स्वतः करु शकले नाहीत आणि पुढच्या पिढीला देऊही शकले नाही. त्यांना एकलकोंडेपणा आला, उदासीनता आली, त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल राग येत नाही, ते स्वतःवर होणाऱ्या अन्यायाबाबतही बोलत नाही. हे सर्व बदलण्याची ताकद शिक्षणात आहे. जपान देशाचे उदाहरण आपणास माहिती आहे. १९४५ मध्ये बेचिराख झालेल्या या देशाने १९८९ फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली असे आपण म्हणतो; त्यामागे होते तेथील २५ शिक्षकच !” असे परिवर्तन घडविण्याची ताकद केवळ शिक्षणातच आहे.

शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणत नाही तो पर्यंत काहीही होणार नाही. हे म्हणणे सोपे असले तरी पुन्हा त्या व्यवस्थेतील प्रत्येक घटकाची ती मानसिकता आहे का ? शिक्षण क्षेत्रात चाकोरी बाहेर जाऊन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना, शैक्षणिक संस्थांना, पालकांना व विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन दिले जाते का ? शिक्षणातील पारंपरिकता घालवून त्यात कालानुरूप आवश्यक बदल घडवून जीवन जगण्यासाठीची उपयुक्तता शिक्षणाने दिली पाहिजे. जो घटक विशेषतः शिक्षक नावीन्यतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांना एका चौकटीत न शिकवता त्यांना स्वशिक्षणाची, स्वानुभवातून शिक्षणाची सवय लावतात ते शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कायम लक्षात राहतात अगदी विद्यार्थ्यांच्या उतारवयातसुद्धा !

शिक्षणातील विज्ञान आणि कला हे वेगळे विषय नसून ते एकत्र करुन शिकविले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासेला, कुतूहलाचा चालना दिली पाहिजे. त्यांच्या हटके विचार करण्याच्या वृत्तीला, कल्पकतेला प्रोत्साहित केले पाहिजे. मुक्त संवाद, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचे वैज्ञानिक, रास्त व वास्तव योग्य उत्तर देण्याची सवय शिक्षक – पालक यांना विकसित करावी लागेल. शिक्षण व्यवसायाभिमुखतेकडे नेत्यांना त्याचा अतिरेक होणार याची काळजी घेतली पाहिजे. यात ज्ञानप्राप्ती व व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची, त्याला आवश्यक असलेले मूल्य शिक्षण देण्याची व्यवस्था उत्पन्न करावी लागेल. समाजाने नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे असे म्हणत असतांना तशी शिक्षण प्रणाली आणि तिचा उद्देश आहे का ? हा खरा प्रश्न आहे. आजची निर्माण झालेली स्पर्धा हि केवळ “अधिक पैसा” यातून निर्माण झाली आहे. नीतिमूल्यं, समाज, पर्यावरण आदी घटक पैश्यापेक्षा अधिक महत्वाचे आपण मानत नाही.

या सर्व गोष्टींना उत्तर शोधायचे असेल आणि अपेक्षित शिक्षण व शिक्षण पद्धती विकसित करायची असेल तर आपण सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे कि, पृथ्वीवर असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीवरच आपले भवितव्य अवलंबून आहे. त्यातूनच आपल्या गरजा भागणार आहेत. आपल्या मर्यादांना मुराद घालत त्याचा व्यावहारिक व शाश्वत विचार लक्षात घेऊन कार्य केले पाहिजे. मानवी नैतिकता, सदाचार यातून सुचणारे मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. अनेकदा आपण त्याला बगल देऊन स्वार्थीवृत्ती बाळगतो, आजची परिस्थिती ओढवून घेतो. एका बाजूला माहितीचा विस्फोट होतो आहे असे म्हणतांना माहितीलाच ज्ञान म्हणण्याची चूक आपण करु लागलो. तंत्रज्ञानाने सुख दिले तरी त्यासोबत काही आव्हानेही दिलीत त्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल याचा विचार करावा लागेल.

सद्यस्थितीत आपण सर्वचजण ज्या समस्यांनी ग्रस्त आहोत, ज्यांच्यावर पर्यायी उपाययोजना असावी असे प्रत्येकालाच वाटते. शालेय जीवनात शिकलेल्या निसर्गचक्रात मानवाने निर्माण केलेल्या बिघाडामुळे हे प्रश्न निर्मण झाले आहेत असे म्हणणेच योग्य ठरेल अर्थात तशी डोळस दृष्टी असावी लागेल. आपण निसर्गचक्राचा आदर राखत आपण सर्वांनी आपले जीवन जगण्याचे ठरविले आपल्याकडील साधनांचा योग्य वापर होईल. आपल्याकडी साधने अर्थात भौतिक धन वाढतच राहील. त्यातून मानसिक समाधान नक्की लाभेल. पण आपण ज्यापद्धतीने प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक ओरबाडण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे वागलो तर आपण स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे लक्षात येईल. शिक्षणाने आपण माणूस म्हणून कसे जगले पाहिजे हेच समजले नाही किंवा त्या शिक्षणाचा चुकीचा वापर करुन आपण स्वतःलाच संपवले तर असे शिक्षण का आणि कशासाठी ?

गिरीश कुळकर्णी
प्रकल्प संचालक, आशा फौंडेशन, जळगाव.
९८२३३३४०८४

Leave A Reply

Your email address will not be published.