शरदराव आणि राहुल गांधी, कृपा करुन लोकांना मूर्ख समजण्याचे पाप करु नका !

0

दहा मार्च 2019 रोजी 17 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारताच्या निवडणुक आयोगाने जाहीर केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण भलतेच तापायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा येऊ न देण्यासाठी मोदी विरोधकांनी आकांडतांडव सुरु केले आहे. भिन्न विचारांचे (?) लोक, एकमेकां  ची तोंडे न पाहणारे नेते एकत्र येण्यासाठी धडपडताहेत पण अजुनही काही जमत नाही. मायावती काँग्रेसला जवळ करायला तयार नाही तसेच महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी तर झुलवत झुलवत काँग्रेसला जणूकाही लाथाडलेच आहे. प्रियंका गांधींच्या जीवावर राहुल गांधी देशात सर्वत्र’ राफेल राफेल’ ची एकतारी वाजवत सुटलेत तेव्हा लोक त्यांची `राफेल’ म्हणजे ‘राहुल फेल’ अशी फोड करुन खिल्ली उडवताहेत. भ्रष्टाचाराच्या नावाने बोंब मारणाऱ्या राहुल – प्रियांकांची स्मृती इराणी यांनी जमीन घोटाळ्याची कागदपत्रे सादर करुन भ्रष्टाचाराचे `फॅमिली पैकेज’ राहुल – सोनिया – वाड्रा परिवार अशा शब्दांत चक्क विकेट घेतली आहे. त्यामुळे सुरजेवाला यांना गांधी वाड्रा परिवाराच्या भ्रष्टाचारी सूरज समोर दिवसाउजेडी अंधार दिसू लागला आहे. संसदेत मिठ्या मारणारे, डोळा मारणारे राहुल गांधी, आता चेन्नईतल्या कॉलेज कुमारांसमोर जीन्स टीशर्टवर रॅम्प वॉक करु लागलेत आणि मला सर म्हणू नका राहुल म्हणा, असे आर्जव करतात. अझराने हाय राहुल असं म्हणून तीन तीनदा दाद देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी तर महिलांच्या घोळक्यात ‘किस बाई किस’ चा खेळही रंगला. लाजतात काय, मुरडतात काय, काय बोलावं? एका पक्षाच्या, ऐतिहासिक म्हणवणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला हे शोभतं का ? न शोभणाऱ्या सर्व गोष्टी करुन कदाचित राहुल गांधी गिनीज बुक मध्ये नाव चमकण्यासही कमी करणार नाहीत. हल्लीची राहुल गांधी यांची भाषणे ऐकल्यानंतर तर असे वाटायला लागलंय की भारत आताच स्वतंत्र झालाय आणि काँग्रेसला पहिल्यांदाच सत्तेवर येण्याची स्वप्ने पहायला, पडायला लागलीय आणि म्हणूनच ते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना आरक्षणाची गाजरे देत सुटलेत. मुंबईत आल्यावर या राहुल गांधींनी 500 चौरस फुटांची घरं देण्याचं गाजर संजय निरुपम यांच्या हाती सुपूर्द केलं. राहुल गांधी यांना स्मृती इराणी भारताचा, काँग्रेसचा इतिहास समजावून सांगतील आणि 70 वर्षाच्या इतिहासात 55 वर्षापेक्षा अधिक काळ काँग्रेस सत्तेवर होते. याची आठवण करुन देतील. राहुल गांधी अमेठीत स्मृती इराणींसमोर 2014 साली लढत देऊन लोकसभेत पोहोचले खरे पण स्वतः विस्मृतीत गेल्यासारखे वाटायला लागले आहे. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत रायफलचा कारखाना सुरु करतांना अमेठीची ओळख आता ‘रायफल निर्माण करणारी अमेठी’ अशी होईल, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, आदी दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा वाहिली त्या काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सरबरीत आणि बिथरलेल्या व्यक्तीसारखे बोलतात तेंव्हा हीच का भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस आणि हेच काय ते काँग्रेसचे नेतृत्व ? आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी यांचे आत्मे स्वर्गात ढळढळा आसवं ढाळत असतील तर जवाहरलाल नेहरु आपल्या पणतूच्या प्रतापामुळे कपाळावर हात मारुन घेत `हेचि फळ काय मम तपाला ?’ असा सवाल विचारत असतील. मुंबईत 500 चौरस फुटाची गाजरं देणाऱ्या राहुल गांधी यांना फार पूर्वी नको पण अलिकडच्या काळात विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याच पक्षाचे नेते मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृहनिर्माण, नगरविकास ही खाती होती आणि धारावीची जगविख्यात झोपडपट्टी विकासाच्या प्रतिक्षेत असतांना साधे 250 चौ.फु.चे घरही देऊ शकली नाहीत. या गोष्टी विस्मृतीत गेल्या काय ? जागतिक बँकेच्या अटीमुळे विलासराव मुंबई चं शांघाय करायला निघाले आणि त्यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई करायला निघाले असतांना त्यांच्या बुलडोझरसमोर आडवे पडून सोनिया गांधी यांच्या कडे धांव घेणारे काँग्रेसचेच नेते होते, हे सर्वांच्या स्मृतीमधे अजूनही आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा जगाला हादरविणारा नेता शरद पवारांना मुंबईतल्या 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरे देण्याची योजना सुपूर्द करतो तेंव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री असलेला जाणता राजा जागेवर बसून (खुर्चीवरुन उठण्याची तसदी न घेता) ती योजना स्वीकारुन केराच्या टोपलीत टाकतो. हेच का झोपडपट्टी वासियांचे प्रेम ? शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत सणसणीत आरोप करतांना अशोक चव्हाण यांनी 19 फेब्रुवारी च्या सरकारी शिवजयंतीच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा केलेला आरोप विधानपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. पुण्याच्या एका बिल्डर मित्राच्या सहाय्याने अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कारभार करीत होते, असाही आरोप तेंव्हा करण्यात येत होता. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय डी.पी. सावंत यांच्यावर माधवराव भांडारी या भाजपाच्या मुख्य प्रदेश प्रवक्त्यांनी वांद्रयाच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते. हेच का अशोकरावांचे `आदर्श’ ? राहुल गांधीजी, हेच अशोकराव तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवून पृथ्वीराजबाबांना मुख्यमंत्री पदावर बसवले त्याचे कारण तुम्हाला माहित आहे नां ? नगरविकास आणि गृहनिर्माण ही खाती तुमच्या कडेच असतांना 500 चौ.फुटांचे घर 15 वर्षात का देऊ शकला नाहीत? मग आताच 500 चौ.फुट, 33 टक्के महिलांना आरक्षण, कर्जमाफी यासारख्या आश्वासनांचे गाजराचे मळे आपण का बरं फुलवण्यास पुढे झालात ?

महिलांना आरक्षण आम्हीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिले महिलांचे धोरण आम्हीच ठरविले. हे निर्णय आम्ही घेतले या संदर्भात काँग्रेसवाले आणि पॉवर कंपनी टिर्या बडवताहेत पण डॉ. मनमोहन सिंह सरकार 10 वर्ष असताना महिलांना संसदेत व विधिमंडळात 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय का होऊ शकला नाही ? सोनिया गांधी त्यावेळी रिमोट कंट्रोल होत्या नां ? मग त्यांच्या रिमोटची बॅटरी लालू प्रसाद आणि मुलायमसिंह यांच्यासमोर का चालली नाही ? विस्मृतीत गेलेल्या राहुल गांधीना अनेक गोष्टी `स्मृती’ मिळवून देण्यासाठी खमक्या आहेत.
महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तऱ्हाच न्यारी झाली आहे. शरद पवार एकदा बोहोल्यार चढतात काय पुन्हा उतरतात काय ? आज 80 वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या शरद पवारांनी `मी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार!’ अशा मार्गदर्शकाच्या भूमिकेत वावरायला हवं. पण आज राष्ट्रीय पक्षाध्यक्षपद आजन्म राखण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करतांना कोणते तत्व स्वीकारले ? त्या तत्वाला पक्ष ज्यावर्षी जन्माला घातला त्याचवर्षी तिलांजली देत सोनिया काँग्रेसशी हातमिळवणी केली. जास्त आमदार निवडून येऊनही मुख्यमंत्री पद काँग्रेसला बहाल केले होते ? 1999 साली टिळक भवनात शरद पवारांच्या विरोधात काँग्रेसच्या रामराव आदिक, विलासराव देशमुख, पतंगराव कदम, रोहिदास पाटील यांच्यापासून समस्त काँग्रेस नेत्यांनी पवारांवर जे तोंडसुख घेतले होते, ती 1999 सालची टिळक भवनातली भाषणे त्यावेळी काम करणाऱ्यांच्या विस्मृतीत गेलेली नाहीत. कृपाशंकर सिंह सारखे नेते तर `यह कौनसी राष्ट्रवादी ? यह तो अवसरवादी काँग्रेस!’ अशी संभावना करीत होते. शरद पवारांनी काँग्रेस पक्षात असतांना साधी दुसरी फळी तयार केली नव्हती, असा आरोप याच टिळक भवनात करण्यात आला होता. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला ज्या कारणासाठी त्या सोनिया गांधींच्या विदेशी मूळ चा मुद्दा सोयीस्करपणे विसरतांना वांद्रे वरळी सागरी सेतूला राजीव गांधी यांचे नाव सोनिया गांधी यांना बरे वाटावे म्हणून सुचवतांना शरद पवारांना कोणत्याही दिग्गज मराठी साहित्यिकाचे, नेत्याचे नाव आठवले नाही. सगळे पक्ष फोडून तयार केलेल्या व दुसऱ्या पक्षातून छगन भुजबळ, गणेश नाईक, धनंजय मुंडे, आनंद परांजपे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ अशा असंख्य मुलांना आणण्यात आले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल लोक काय म्हणणार? रायगड जिल्हा तटकरे कुटुंबियांना आंदण देणाऱ्या शरद पवारांनी त्यांचे खजांची म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर धारकर परिवाराला काय दिले ? वसंत चव्हाण सारखा दिग्गज नेता निवर्तल्यानंतर त्यांच्या पत्नींनी राज्यसभा मिळेल व वसंतरावांची स्वप्ने पूर्ण करु म्हणून नोकरीचा राजीनामा दिला पण त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने राज्यसभेवर पाठवले. हे कन्याप्रेम नव्हते का ? खरे आहे, शरदराव आपण म्हणालात ते, की मी माझ्या पोरांचे लाड करीन दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी कशाला पूरवू ? म्हणूनच अजित दादांच्या `पार्थ’ ला प्रारंभी विरोध करताना तोही कुणाचा, आपल्या पुतण्याचाच मुलगा आहे हे विसरलात ? सुप्रिया ती आपली आणि पार्थ कोण ? आता शेवटी माढा मधले वातावरण फिरले आणि अजित दादांचा संताप उफाळून आला तेंव्हा आपली इच्छा ‘मावळ’ली आणि पार्थसाठी नाईलाजाने तयार झालात. तिथेपण पुन्हा आपलीच सोंगटी वाजावी म्हणून रोहितकरवी आग्रह पुढे आणण्याची चर्चा आहे. जरा आपले मानसपुत्र आव्हाडसाहेब यांना परिस्थितीचे भान करुन द्या, पवार साहेब, पोरं पळवणारी टोळी असा भाजपावर आरोप करणे राष्ट्रवादीच्या नेत्याला शोभते काय ? अवधूत वाघ आणि नरेंद्र पवार यांनी उत्तर तर दिले आहेच पण आपले परमप्रिय मित्र बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उध्दव ठाकरे यांनी आम्ही आमच्या पोरांबरोबरच दुसऱ्यांच्या पोरांचेही लाड करतो, लाड पुरवतो. त्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरत नाही. ही जी सणसणित लगावली त्यामुळे तमाम राष्ट्रवादी नेत्यांचे गाल लाल झाले असतील. एकाबाजूस यशवंतरावांचे नांव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूस यशवंतरावांच्या विचार संस्कृतीला मूठमाती द्यायची हे शोभत नाही आपल्यासारख्या नेत्याला. शिवाजीराव आढळराव पाटील सारख्या दिग्गज नेत्यासमोर शिवसेनेतून आयात करुन `अमोल’ ला उभे करण्याचा घाट घातला. हा अमोल पण पळवलातच ना ? आनंद परांजपे यांना काय कमी केले होते शिवसेनेने ? शिवसेनेत प्रवक्ता बनवले. प्रकाश परांजपे यांचा पूत्र म्हणून कल्याण येथून डावखरे सारख्या नेत्याला पराभूत करुन दिल्लीला पाठवले. त्यांना स्वतःची कोणती पार्श्वभूमी होती ? आनंद परांजपेना आव्हाडांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीत आणून काय दिले? आता पुन्हा त्याला बळीचा बकरा बनवण्यासाठी ठाण्यास उभा केला. राज्यसभेची मुदत 2020 च्या एप्रिल पर्यंत असल्यानचे आपल्याला आधी `माढा’ च्या बोहोल्यावर चढतांना विस्मृतीत गेले होते का ? आता पार्थला जागा मोकळी करतांना एप्रिल 2020 ची मुदत एकदम अचानक आठवली ? भास्कर जाधवांच्या मुलाने बंडखोरी केली, नवाब मलिक यांचा भाऊ मनसेत गेला, विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातली मंडळी कमळ हाती घेऊ लागली तेव्हा न बोलणारे हीना गावित भाजपात गेल्याबरोबर डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात कारवाई करणारी राष्ट्रवादी काँग्रेस ? काय हेच तुमचे आदिवासी बांधवांबद्दलचे प्रेम ? मराठा, मुस्लीम आणि आदिवासी यांच्यात सुध्दा आपण भेदभाव करता ? वर्षानुवर्षे सत्तेची फळे चाखताना, सत्ता उपभोगतांना मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षण आठवले नाही. महिला, शेतकरी आठवले नाहीत. शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वीटही 15 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या दोन्ही काँग्रेस वाल्यांना ठेवता आली नाही आणि जनतेने 2014 साली सत्तेवरुन उखडून फेकले, तेव्हा या साऱ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्यात ? आज देवेंद्र फडणवीस सरकारने किमान 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा केल्यात. विकास कामांची जंत्री समोर उभी केली. स्मारकांची भूमिपुजने झाली. तेंव्हा आता तुम्हाला बांधावरच्या शेतकरी, शेतमजूर, काम करणारी महिला आठवली काय ? हेच सर्वजण सर्व गोष्टी `स्मृती’ मध्ये ठेवून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत तुमचा हिशेब चुकता करतील, यात वाद नाही. कृपा करुन लोकांना मुर्ख समजण्याचे पाप करु नका.

योगेश वसंत त्रिवेदी  मो. 9892935321

Leave A Reply

Your email address will not be published.