शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल

0

नवी दिल्ली :- भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल होणार आहेत. चंदिगडच्या एअर फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे कार्यक्रमाद्वारे हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून याच चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने ओसामा बिन लादेन या अतिरेकाचा खात्मा केला होता.

चिनुक हेलिकॉप्टर्स संदर्भात भारताचा अमेरिकेसोबत करार झाला आहे. या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. यापैकी पहिल्या खेपेतील चार हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रार्पण झाले. चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी हजेरी लावली. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या उपस्थित राहिल्या नाहीत.

अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे. १९८६ पासून हवाई दलाकडे चंदीगडच्या 3-BRDमध्ये ४ Mi-26 हेलिकॉप्टर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.