विवाह सोहळा, धार्मिक सांस्कृतिक, सभा मोठे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा सर्व प्रकारचे कार्यक्रम आता करता येणार पण असणार निर्भंध

0

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आदेश

धार्मिक, सांस्कृतिक व अन्य गदी होणा-या तत्सम कार्यक्रमांना परवानगी देणेबाबत.. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेले परिपत्रक जसेच्या तसे पुढीलप्रमाणे

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक 14 मार्च, 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे, आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण ৪220/ प्र क्र 224/ सां का 4, दिनांक 05 नोव्हेंबर, 2020 अन्वये कोविड-19 च्या पाश्श्वभुमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आलेली आहेत. तसेच या कार्यालयाकडील दिनांक 03 डिसेंबर, 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देण्याबाबत व खुले लॉन्स, विना वातानुकूलीत मंगलकार्यालये/ हॉल/ सभागृहे या ठिकाणी कार्यक्रम आयोजिक करण्यास परवानगी देण्याबाबत सर्व संबंधितांना सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

सदरची बाब लक्षात घेता, सद्य:स्थितीत वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, महोत्सव, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी मिळणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडेस मोठया प्रमाणात अर्ज, निवेदने प्राप्त होत असतात. प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे नियमावली (SOP) निश्चित करण्यात येत आहेत.

अ) धार्मिक कार्यक्रम / दिंडी / यात्रा / पालखी सोहळा :- (मोठया प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम) 1) शासन आदेश दिनांक 14 नोव्हेंबर, 2020 अन्वये मोठया प्रमाणावर गर्दी होणारे धार्मिक कार्यक्रम / सभा घेण्यास बंदी घालण्यात आलेली असल्याने जळगांव जिल्हयात मोठया प्रमाणात गर्दी होणा-या धार्मिक कार्यक्रम / सभा यांना बंदी राहील. 2) धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यास परवानगी असणार नाही. 3) गर्दी न होणा-या धार्मिक कार्यक्रमांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. 4) स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येणा-या धार्मिक कार्यक्रमांना 50 पेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार नाही,

या अटीवर परवानगी देण्याची कार्यवाही संबंधित Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी करावी.

ब) सांस्कृतिक कार्यक्रम :- महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 8220/प्रक्र 224/सां का 4, दिनांक 05 नोव्हेंबर, 2020 अन्वये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहांमध्ये सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्याबाबत व मोकळया जागेत आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांबाबत मागदर्शक तत्वे जाहिर करण्यात आलेले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक डीएमयु/2020/प्रक्र 92/डीआयएसएम-1, दिनांक 06 जानेवारी 2021 अन्वये नाटक लोककले अंतर्गत तमाशा, लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत नमूद आहे. त्यानुसार नाटक, लोककले अंतर्गत तमाशा, लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांबाबत संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांना केवळ सुचीत करण्यात यावे.

क) इतर कार्यक्रम / सभा / बैठका :- विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, मेळावे, बैठका तसेच संघटनांच्या बैठका, सभा, संचालक मंडळांच्या बैठका, सभा, शैक्षणिक संस्थांद्वारे आयोजित केल्या जाणा-या सभा, मुलाखती, साहित्य संमेलने, प्रदर्शन व विक्री केंद्रे इत्यादी प्रकारच्या कार्यक्रमांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करावे.

ड) क्रिडा स्पर्धा :- कोणत्याही प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करतांना जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगांव यांचे अभिप्राय घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही वेगळी परवानगी दिली जाणार नाही, तसेच वर नमूद केलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी संबंधितांनी सुची अ ते ड मध्ये नमूद केल्यानुसार संबंधित सक्षम प्राधिकारी / स्थानिक स्वराज्य संस्था / स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडेस अर्ज सादर करावेत. तथापि, सुची अ ते ड मध्ये नमूद कार्यक्रमांना परवानगी देत असतांना कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची दक्षता परवानगी देणा-या प्राधिकरणाने घ्यावी

वर नमूद अ ते ड मधील कार्यक्रमांना परवानगी देतांना शासनाकडील मार्गदर्शक सुचना तसेच खालील अटी व शर्ती लागू असतील.

1) 10 वर्षाखालील बालके, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक यांना शक्यतो प्रवेश टाळण्यात यावा.

2) सर्व नागरिकांनी चेह-यावर मास्कचा वापर करणे आवश्यक राहील.

3) सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे बंधनकारक राहील.

4) प्रवेशाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटाईजरचा वापर करणे आवश्यक राहील. 5) कार्यक्रमाच्या ठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे.

6) कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणा-या सर्व उपकरणांचे तसेच कार्यक्रम स्थळाचे कार्यक्रमापूर्वी व नंतर निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील.

कोणत्याही कार्यक्रमांना मोठया प्रमाणात गर्दी होऊन कोविड-19 नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार संबंधित सक्षम प्राधिकारी/ स्थानिक स्वराज्य संस्था / स्था पोलीस स्टेशन यांनी कारवाई करावी.

(अभिजीत राऊत) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव

Leave A Reply

Your email address will not be published.