विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर

0

मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन नागपूर इथं होत आहे. कामकाजाचा आजचा पहिला दिवस असून विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळं नव्या सरकारची कसोटी लागणार आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरुनही विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचे पद आहे. या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर यांचे नाव कालपासून आघाडीवर होते. पण अखेरच्या क्षणी प्रविण दरेकर यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे. आपल्या जोरदार भाषणांनी धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद हलवून सोडली होती. आता तशीच अपेक्षा प्रविण दरेकर यांच्याकडून असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.