वाळूमाफियांची दादागिरी: वाळूने भरलेले ट्रॅक्टर धमकावून पळविले

0

जळगाव, दि.12 –
शहरासह जिल्ह्यात वाळूमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करीत असलेले ट्रक्टर महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले होते. पकडलेले ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून येत असलेल्या अव्वल कारकूनला धमकावून ट्रॅक्टर घेवून चौघांनी पळ काढला.
वाळू ठेके सुरू झालेले असले तरी अवैध वाळू वाहतूकीचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. महसूल विभागाकडून नियमीत कारवाई करण्यात येत असली तरीही चोरटी वाळू वाहतूक सुरूच असते. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक गस्तीवर होते. सकाळी 11 च्या सुमारास निमखेडी शिवाराकडून शहरात येत असलेले ट्रॅक्टर पथकाने पकडले.
ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतर महसूल विभागातील अव्वल कारकून रविराज सुरेश बाविस्कर हे स्वतः ट्रॅक्टर चालवून पोलीस ठाण्यात आणत होते. कांताई नेत्रालय ते दूध फेडरेशन दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीवर चार जण त्यांचा पाठलाग करीत होते. ट्रॅक्टर दूध फेडरेशनजवळ आल्यानंतर चौघांनी ट्रॅक्टर त्याठिकाणी अडविले. रविराज बाविस्कर यांना ट्रॅक्टरखाली उतरण्यास त्यांनी धमकावून सांगिलते. त्यानंतर ट्रॅक्टर त्याच ठिकाणी खाली करून चौघांनी ट्रॅक्टरसह पळ काढला. याप्रकरणी रविराज बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक, चालक व दुचाकीस्वार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि महेश जानकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.