वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल १२५ दर रुपयांपर्यंत पोहोचणार?

0

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत असल्याचं सांगत आहे. इंधनाचे दर कधी कमी होणार, दर कमी होणार की नाही, असे प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे. आता सर्वांच्या नजरा 1 जुलैला होणाऱ्या OPEC+ देशांच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यामध्ये उत्पादन धोरणावर निर्णय होणार आहे. रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे.

जर OPEC+ देशांच्या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतात लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, याचा दबाव सरकारवर आहे. त्यातच सरकारने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून इंधनाचे दर कमी केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लिटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम सर्वांवर होतो. त्यातच महसूल घटल्यामुळे सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. परिणामी पेट्रोलचे दर वाढणार असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.